गृह विलगीकरणातील रुग्णांवर विशेष लक्ष ठेवा – जिल्हाधिकारी अजय गुल्हाने

गृह विलगीकरणातील रुग्णांवर विशेष लक्ष ठेवा – जिल्हाधिकारी अजय गुल्हाने

Ø आता जिल्ह्यात घरोघरी लसीकरण मोहीम

चंद्रपूर, दि. 4 जुलै : जिल्ह्यात कोरोना ॲक्टीव्ह रुग्णांची संख्या हळूहळू वाढत असल्याचे निदर्शनास येत आहे. यासाठी आतापासून काळजी घेतली नाही तर पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सद्यस्थितीत जे ॲक्टीव्ह रुग्ण आहेत, त्यांच्या संपर्कातील रुग्णांचा शोध तसेच त्यांचे टेस्टींग करणे गरजेचे आहे. विशेष म्हणजे गृह विलगीकरणात जे रुग्ण आहेत, त्यांनी बाहेर फिरता कामा नये. अशा रुग्णांवर आरोग्य विभागाने गांभिर्याने लक्ष द्यावे, असे निर्देश जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी दिले.

वीसकलमी सभागृहात आयोजित जिल्हा टास्क फोर्सच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मिताली सेठी, अतिरिक्त जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, मनपा उपायुक्त विपीन पालीवाल, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत, जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. संदीप गेडाम आदी उपस्थित होते.

जिल्ह्यात सद्यस्थितीत ॲक्टीव्ह रुग्णांची संख्या 50 च्या वर आहे, असे सांगून जिल्हाधिकारी श्री. गुल्हाने म्हणाले, या रुग्णांच्या संपर्कातील नागरिकांचा शोध घेऊन आरोग्य विभागाने त्यांचे त्वरीत टेस्टींग करावे. चिमूरमध्ये ॲक्टीव्ह रुग्णांची संख्या जास्त आहे. तेथे आरोग्य विभागाने विशेष लक्ष द्यावे. तसेच गृह विलगीकरणातील रुग्ण घरीच असल्याची यंत्रणेमार्फत खात्री करावी. जिल्ह्यात ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांना आपत्ती व्यवस्थापन कक्षातून नियमित कॉल गेला पाहिजे, अशा सूचना त्यांनी दिल्या.

लसीकरणाचा पहिला, दुसरा तसेच पात्र लाभार्थ्यांनी प्रतिबंधात्मक डोज घेणे आवश्यक आहे. ज्यांचे लसीकरण राहिले आहे, त्यांच्यासाठी जिल्ह्यात आता घरोघरी लसीकरण मोहीम राबविण्यात येईल. 12 ते 14 आणि 15 ते 17 वर्षे वयोगटासाठी शाळा / महाविद्यालयात लसीकरणाचे विशेष सत्र लावण्यात येईल. त्यासाठी सर्व पालकांनी आपल्या पाल्याचे लसीकरण करून प्रशासनाला सहकार्य करावे. तालुक्याच्या ठिकाणी पंचायत समिती स्तरावर सुद्धा लसीकरणाचे सत्र आयोजित करण्याबाबत आरोग्य विभागाने नियोजन करावे, असेही जिल्हाधिकारी म्हणाले.

आतापर्यंत झालेले लसीकरण : जिल्ह्यात आतापर्यंत 31 लक्ष 66 हजार 344 डोजचे लसीकरण झाले आहे. यात पहिला डोज 17 लक्ष 10 हजार 32, दुसरा डोज 14 लक्ष 23 हजार 158 तर प्रतिबंधात्मक डोस 33154 आहे. प्रतिबंधात्मक डोस हा 18 ते 59 वर्षापर्यंतच्या नागरिकांनी स्वत: विकत घ्यायचा असून क्राईस्ट हॉस्पीटल आणि शिवजी हॉस्पीटल येथे पेड स्वरुपात उपलब्ध आहे. तर 60 वर्षावरील नागरिक, फ्रंट लाईन वर्कर, हेल्थ केअर वर्करसाठी हा डोज मोफत आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात पात्र असलेल्या 3 लक्ष 20 हजार 596 जणांचा प्रतिबंधात्मक डोज अद्याप बाकी आहे, असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.