पीएम स्वनिधी योजना अंतर्गत १९७० पथविक्रेत्यांना मिळाला १०,०००/- रुपये कर्जाचा लाभ ११६ लाभार्थ्यांनी घेतला रुपये २० हजार कर्जाचा लाभ

पीएम स्वनिधी योजना अंतर्गत १९७० पथविक्रेत्यांना मिळाला १०,०००/- रुपये कर्जाचा लाभ
११६ लाभार्थ्यांनी घेतला रुपये २० हजार कर्जाचा लाभ
८८१ लाभार्थी २० हजार रुपयांच्या कर्जासाठी पात्र  

चंद्रपूर १४ जुन – प्रधानमंत्री पथविक्रेते आत्मनिर्भर निधी योजना ( पीएम स्वनिधी योजना) अंतर्गत चंद्रपूर शहर महानगरपालिकेमार्फत दिल्या जाणाऱ्या १० हजार रुपये कर्जाचा लाभ १९७० लाभार्थ्यांनी घेतला आहे. यातील ११६ लाभार्थ्यांनी कर्ज परत करून रुपये २० हजार कर्जाचा लाभ घेतला असुन इतर ८८१ लाभार्थी २० हजार रुपये कर्जासाठी पात्र झाले आहेत.
दिनांक १३/०६/२०२२ ला चंद्रपूर शहर महानगरपालिका येथे यासंदर्भात आढावा बैठक अतिरीक्त आयुक्त विपीन पालीवाल यांच्या अध्यक्षतेखाली  आयोजित करण्यात आलेली होती. याप्रसंगी चंद्रपूर जिल्हा अग्रणी बँक, बँक ऑफ इंडियाचे प्रबंधक प्रशांत धोंगळे, चंद्रपूर शहरातील राष्ट्रीय बँक यांचे प्रतिनिधी व चंद्रपूर शहरातील पथविक्रेता संघटना यांचे पदाधिकारी व प्रतिनिधी तसेच मनपाचे संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
पथविक्रेत्यांना त्यांचा व्यवसाय पुन्हा सुरु करण्यासाठी खेळत्या भांडवलाचा पतपुरवठा तातडीने प्रदान करण्यासाठी शासनाकडून प्रधानमंत्री पथविक्रेते आत्मनिर्भर निधी योजना सुरू करण्यात आली आहे. योजनेअंतर्गत पथविक्रेत्यांना व्यवसायाकरीता  एका वर्षासाठी विनातारण कर्ज रु.१०,०००/- राष्ट्रीयकृत बँक मार्फत देण्यात येते. जे पथविक्रेते नियमित कर्ज परतफेड करतात त्यांना बँकेकडून २० हजारांचे अतिरीक्त कर्ज उपलब्ध केले जाते.
योजनेअंतर्गत महानगरपालिकेतर्फे आतापर्यंत १९७० पथविक्रेत्यांना १०,०००/- रुपये कर्जाचा लाभ मिळाला असुन यातील ८८१ लाभार्थ्यांनी कर्ज परत केले आहे. यापैकी ११६ लाभार्थ्यांनी २० हजार रुपयांचे अतिरिक्त कर्जाचा लाभ घेतला आहे. तर उर्वरित अतिरिक्त कर्जासाठी पात्र झाले आहेत. चंद्रपूर शहर महानगरपालिका अंतर्गत ही  योजना कार्यान्वित असून  या योजनेच्या लाभाकरीता ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरु आहे. शहरातील पथविक्रेत्यांनी चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील आपले सरकार सेवा केंद्र  (सेतू केद्र /नागरी सुविधा केंद्र) व ग्राहक सेवा केंद्र येथे ऑनलाईन अर्ज करावेत.  तरी  शहरातील पथविक्रेते यांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन चंद्रपुर शहर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.
अनौपचारिक नागरी अर्थव्यवस्थेचा अत्यंत महत्वाचा घटक असलेले पथविक्रेते शहरवासीयांच्या आर्थिक कुवतीप्रमाणे स्वस्त दरात वस्तू व सेवांची उपलब्धता करण्यात महत्वपूर्ण भूमिका बजावतात. नियमित परतफेड करण्यासाठी प्रोत्साहन देणे आणि डिजिटल व्यवहारास प्रोत्साहन देणे. या उद्दिष्टांच्या आधारे पथविक्रेत्यांना अर्थसहाय्य करण्यास सदर योजना नवीन संधी उपलब्ध करीत आहे.