अतिरिक्त भंडारा औद्योगिक विकास क्षेत्रासाठी लवकरच सकारात्मक निर्णय घेणार-  उद्योग मंत्री उदय सामंत

अतिरिक्त भंडारा औद्योगिक विकास क्षेत्रासाठी लवकरच सकारात्मक निर्णय घेणार–  उद्योग मंत्री उदय सामंत

भंडारा,दि.10 : जिल्ह्यामध्ये स्थानिक उद्योग वाढीसाठी शासनाचे उद्योग स्नेही धोरण असून  या उद्योगांमधूनच रोजगार निर्मिती मोठ्या प्रमाणावर झाली पाहिजे हे लक्षात घेता सध्या जिल्ह्यात असलेल्या औद्योगिक विकास क्षेत्राखेरीज अतिरिक्त औद्योगिक क्षेत्र निर्मितीसाठी शासन लवकरच सकारात्मक निर्णय घेईल. त्यासाठी एमआयडीसीने पाठवलेल्या प्रस्तावांची उच्चस्तरीय गठित समितीद्वारे पाहणी करून जलद निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आज  दिली. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील उद्योग व रोजगार क्षेत्राचा आढावा त्यांनी घेतला तसेच औद्योगिक संघटनांच्या प्रतिनिधींशी संवाद देखील साधला.

या बैठकीला आमदार नरेंद्र भोंडेकर, जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर, उपजिल्हाधिकारी महसूल श्रीपती मोरे, अतीरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कमलाकर रणदिवे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सचिन पानझाडे, जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक श्री. बदर, तसेच एमआयडीसीचे प्रादेशिक व्यवस्थापक मुकेश पटेल हे प्रामुख्याने उपस्थित होते.

यावेळी उद्योग मंत्र्यांनी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाचे नियोजित उद्दिष्ट व उद्दिष्ट पूर्ण करण्यात येणाऱ्या अडचणींवर मार्गदर्शन करण्यासाठी लवकरच जिल्हाधिकारी व लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत या योजनेविषयी जिल्हास्तरीय कार्यशाळा घेण्याचे निर्देशित केले. भंडारा जिल्हा पितळेच्या भांड्यांसाठी प्रसिद्ध असून पितळ व तांब्याच्या उद्योगासाठी उद्योगाचे क्लस्टर तयार करावे, या क्लस्टरसाठी उद्योग विभागातर्फे आवश्यक त्या सर्व परवानग्या व कार्यवाही तातडीने करण्याविषयी त्यांनी जिल्हाधिकार्याना निर्देशित केले.

आमदार श्री. भोंडेकर यांनी भंडारा औद्योगिक क्षेत्रामध्ये जागा उपलब्ध नसल्यामुळे नवीन जागा संपादन करण्याबाबत मागणी केली. त्या अनुषंगाने उद्योग मंत्र्यांनी नवीन औद्योगिक क्षेत्रात स्थापन करण्याकरींता जागेची पाहणी करून प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले. तसेच मौजा खरबी व खराडी येथील जागेच्या भूसंपादनाचा प्रस्ताव तातडीने मार्गी लावण्याची सूचना एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांना केली. तसेच तुमसर येथील रेल्वेच्या रेक पॉईंटबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार उद्योग विभाग या रेक पॉईंटच्या निर्मितीसाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करेल अशी हमी उद्योग मंत्र्यांनी यावेळी दिली. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खते, औषधे, बी- बियाणे वेळेत उपलब्ध होण्यासाठी तुमसर येथील रेक पॉईंटचा मोठ्या प्रमाणावर उपयोग होणार आहे. त्याशिवाय या जिल्ह्यातील उच्च दर्जाचा तांदूळ व अन्य उत्पादने देखील पाठविण्यासाठी या रेल्वे  रेक पॉईंटचा उपयोग होणार असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिली.

यावेळी जिल्ह्यात एकूण सात औद्योगिक क्षेत्रातील औद्योगिक विकासाच्या प्रगतीचे एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी सादरीकरण केले. भंडारा व साकोली हे दोन मोठे औद्योगिक क्षेत्र तसेच लघु औद्योगिक क्षेत्र मोहाडी, तुमसर, लाखांदूर, पवनी, मकरधोकडा मध्ये सध्या असलेल्या विकसित भूखंडाची तसेच उत्पादनातील भूखंडाची सविस्तर माहिती मंत्री श्री. सामंत यांना दिली. बैठकीनंतर उद्योग मंत्री श्री. सामंत यांनी दसरा मैदानावर आयोजित विदर्भस्तरीय दहीहंडी स्पर्धेचे उद्घाटन सोहळ्याला उपस्थिती लावली.