आदिवासी, गैरआदिवासी शेतकऱ्यांकडून शेतजमीन विक्रीचे प्रस्ताव आमंत्रित Ø अनुसूचित जमातीच्या उत्थानाकरिता सबळीकरण व स्वाभिमान योजना

आदिवासी, गैरआदिवासी शेतकऱ्यांकडून शेतजमीन विक्रीचे प्रस्ताव आमंत्रित

Ø अनुसूचित जमातीच्या उत्थानाकरिता सबळीकरण व स्वाभिमान योजना

चंद्रपूर दि. 9 मे : आदिवासी विकास विभागाच्या वतीने अनुसूचित जमातीच्या उत्थानाकरिता सबळीकरण स्वाभिमान योजनेच्या माध्यमातून भूमिहीन दारिद्र्यरेषेखालील अनुसूचित जमातीच्या शेतमजूर कुटुंबांना उत्पन्नाचे स्त्रोत उपलब्ध व्हावे. त्यांचे राहणीमान उंचावण्यासाठी मदत व्हावी व त्यांचा आर्थिक विकास व्हावा यासाठी जिरायती व बागायती जमिनीचे वाटप करण्याची योजना चंद्रपूर, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प या कार्यालया अंतर्गत येत असलेल्या 10 तालुक्यात राबविण्यात येत आहे. यासाठी शेतजमीन खरेदी करावयाची असून शेतजमीन विक्रीस इच्छुक आदिवासी, गैरआदिवासी शेतकऱ्यांकडून सन 2022-23 या आर्थिक वर्षात शेतजमीन विक्रीचे प्रस्ताव मागविण्यात येत आहे.

ईच्छुक शेतकऱ्यांनी जमिनीचा 7/12, गाव नमुना-8, परिसरातील प्राथमिक स्वरूपाचा कृषी पतपुरवठा सहकारी सेवा सोसायटीचे कर्ज थकबाकी नसल्‍याचे नाहरकत प्रमाणपत्र, अर्जदाराचे कुटुंबातील पती-पत्नी, भाऊ, मुले व 7/12 उताऱ्यावरील हिस्सेदार यांचे संमतीपत्र, विक्री करावयाचे जमिनीचे क्षेत्रफळ त्यावर इतरांचे अतिक्रमण नसल्याचे प्रतिज्ञापत्र, जमीन मोजणी विभागाची जमीन मोजण्याची शीट व टाचण नकाशा, ज्या भागातील जमीन आहे, त्या भागातील जमिनीचे शासकीय दराबाबत संबंधित उपनिबंधक यांचे प्रमाणपत्र, तसेच मूल, सावली, सिंदेवाही, बल्लारपूर, चंद्रपूर, गोंडपिपरी, राजुरा, जिवती, कोरपणा व  पोंभुर्णा या तालुक्यातील जमीन धारकांना प्रस्ताव सादर करता येईल. शेतजमीन विक्रीस इच्छुक आदिवासी, गैरआदिवासी शेतकऱ्यांनी दि. 10 ते 15 मे 2022 पर्यंत पटवारी साजा निहाय अर्जासोबत दिलेल्या कागदपत्रांसह एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, चंद्रपुर कार्यालयात संपर्क साधावा. असे सहायक जिल्हाधिकारी तथा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे  प्रकल्प अधिकारी रोहन घुगे यांनी कळविले आहे.