युवकांमधील नविन्यतेस चालना देण्यासाठी अभ्यास व माहिती सत्रांचे आयोजन

युवकांमधील नविन्यतेस चालना देण्यासाठी अभ्यास व माहिती सत्रांचे आयोजन

  • महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीचा उपक्रम

भंडारा, दि. 27 :  युवकांच्या नविन्यतेस चालना देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी व सिस्को लाँचपॅड यांच्या संयुक्त विद्यमाने “इंडिया टेक्नोप्रेन्योरशिप सिरीज” चे आयोजन करण्यात आले आहे. या सिरीजमध्ये प्रारंभिक टप्प्यातील तरुण विद्यार्थी, नवउद्योजक, स्टार्टअप्स आणि उद्योजकांसाठी व्यवसाय आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानावरील अभ्यास व माहिती सत्रे आयोजित केली जाणार आहेत. हे सत्र उद्योग व नाविन्यता परिसंस्थेतील तज्ञांद्वारे घेतले जाणार असून ज्यामधे कल्पना तयार करणे, कल्पना संरक्षित करणे आणि कल्पनेचा विस्तार करणे याविषयी विशेष प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

नुकतेच या अंतर्गत व्यवसाय सत्रांना सुरवात झाली असुन 29 एप्रिलपर्यंत ते होतील. तसेच तंत्रज्ञान सत्रे 2 मे ते 6 मे 2022 रोजी होणार असून सत्रांमध्ये AI, IoT, क्लाउड कम्प्युटिंग आणि ब्लॉकचेन यासारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञान यांचा समावेश असेल. नवोदित व उद्योजकांना कल्पना कशी तयार करावी, टिकवून ठेवावी, विस्तारीत करावी यांचे ज्ञान देण्यात येईल.

या सिरीज अखेरीस एक “पिच डे” आयोजित केला जाणार असून सहभागी झालेल्या नवउद्योजकांना त्यांच्या कल्पना गुंतवणूकदार, तज्ज्ञ यांच्यासमोर सादर करण्याची संधी मिळेल. सत्र पूर्ण झाल्यानंतर सर्व सहभागींना ई-प्रमाणपत्र मिळेल. विजेत्या आणि उत्कृष्ट कल्पनांना सिस्को लाँचपॅडतर्फे विशेष मार्गदर्शन तसेच क्रेडिट्स आणि 1.5 लाख रुपयांपर्यंतचे आर्थिक सहाय्य मिळेल.

“इंडिया टेक्नोप्रेन्योरशिप सिरीज” उपक्रमामुळे राज्यातील होतकरू विद्यार्थी, उद्योजक, नवउद्योजक आणि प्रारंभिक टप्प्यातील स्टार्टअपचे संस्थापक यांना विशेष फायदा होणार आहे. तरी यामध्ये सहभागी होण्यासाठी उद्योजक, विद्यार्थी व  स्टार्ट अपचे संस्थापक यांच्याकडून अर्ज मागविण्यात येत आहे इच्छुक उमेदवारांनी https://msins.in/events या संकेतस्थळावर अर्ज करावे. या कार्यक्रमात जास्तीत जास्त विद्यार्थ्यानी सहभागी होण्यासचे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उदयोजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त भैयाजी येरमे यांनी केले आहे