पुरोगामी महाराष्ट्रात बहुजन समाज पार्टीची ‘राजकीय प्रयोगशाळा’ उभारणार! वर्षभरात १ लाख कॅडर तयार करण्याचे पक्षाचे लक्ष-अँड.संदीप ताजने

पुरोगामी महाराष्ट्रात बहुजन समाज पार्टीची राजकीय प्रयोगशाळा‘ उभारणार!

वर्षभरात १ लाख कॅडर तयार करण्याचे पक्षाचे लक्ष-अँड.संदीप ताजने

मुंबई१६ मार्च

फुले-शाहु-आंबेडकरांच्या वैचारिक वारसा पुढे घेवून जात बहुजन नायक मान्यवर कांशीराम जी यांनी दाखवलेल्या मार्गावर पुरोगामी महाराष्ट्रात बसपाची ‘राजकीय प्रयोगशाळा’ उभारणार असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष अँड.संदीप ताजने यांनी बुधवारी दिली. संघटनेच्या अनुषंगाने पोषक असलेले विदर्भ आणि मराठवाडा या ध्येयपूर्तीच्या मार्गात केंद्रस्थानी राहतील, असे देखील अँड.ताजने म्हणाले. राज्यात ९ आणि १० एप्रिल रोजी राज्यस्तरीय चिंतन शिबिराचे आयोजन करण्यात आले असून आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने जिल्हानिहाय जबाबदाऱ्यांचे वितरण यावेळी केले जाईल,असे त्यांनी स्पष्ट केले.

युपीच्या निवडणुक निकालाचा प्रभाव महाराष्ट्रात पडणार नाही. महाराष्ट्र फुले-शाहू-आंबेडकरांची कर्मभूमी आहे. मात्र महाराष्ट्रात आजतागायत फुले-शाहू-आंबेडरांच्या विचारांचे ‘निळ्या’ झेंड्याचे सरकार निर्माण होवू शकले नाही. कारण महाराष्ट्रातील बसपाला मानणारा आंबेडकरी समाज आशा म्हणून उत्तर प्रदेशकडे बघायचा. परंतु, उत्तर प्रदेशच्या निकालानंतर महाराष्ट्राला एक सुवर्णसंधी प्राप्त झाली आहे. ज्यात महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातील आंबेडकरी समाज स्वत:ला सिद्ध करून फुले-शाहु-आंबेडकरांच्या विचारधारेची प्रयोगशाळा उभारत राज्य सरकार निर्मितीचा प्रयत्न करणार आहे, असे प्रतिपादन पक्षाचे राष्ट्रीय महासचिव डॉ.अशोक सिद्धार्थ साहेब यांनी केले.

पक्षाचे राज्य प्रभारी मा.नितीन सिंह जाटव साहेब, प्रदेश प्रभारी मा.प्रमोद रैना साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाने वर्षभरात १ लाख ‘कॅडर’ उभे करण्याचा निर्धार केला आहे. हे लक्ष गाठण्यासाठी २९ आणि ३० एप्रिल रोजी १ हजार कार्यकर्त्यांचे राजस्तरीय कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराचे (कॅडर कॅम्प) आयोजित करण्यात आले आहे. निवडणूक जिंकण्यासाठी, जिंकवून आणण्यासाठी यंत्रणा उभी करण्याची गरज असल्याने उमेदवारी मागण्यापेक्षा ‘हत्ती’ निवडणूक चिन्ह निवडून आणण्याचा प्रयत्न करण्यात येईल. राज्यात बसपाचा मतदार अधिक वृद्धिंगत करण्यासाठी संघटना प्रयत्नरत आहे. यासाठी आगामी काळात ‘बामसेफ’चे राज्यस्तरीय अधिवेशन आयोजित करण्यात येईल. शिवाय शोाषित, पीडित, उपेक्षितांमधील सांस्कृतिक परिवर्तनासाठी ‘जागृती जत्था’ निर्माण करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.

पक्ष विस्तारासह संघटनेची भूमिका प्रभावीपणे सर्वसामान्यांपर्यंत पोहचवण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करण्यात येणार असल्याचे अँड.ताजने म्हणाले. सक्षम पदाधिकाऱ्यांना विदर्भामध्ये पक्षाचा उमेदवार निवडून येऊ शकेल अशा विधानसभा मतरदार संघाची जबाबदारी देण्यात येईल. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने स्थानिक स्तरावर लोकहितासाठी आंदोलन, धरणे, निदर्शने करीत समाजाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे. दर रविवारी किमान २० कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत एका विधानसभेत किमान १ ‘कॅडर कॅम्प’  आयोजन करण्याच्या सूचना पदाधिकाऱ्यांना देण्यात आल्या असल्याचे अँड.ताजने म्हणाले.