जिल्ह्यात 12 ते 14 वयोगटातील मुला-मुलींच्या लसीकरणास सुरुवात

जिल्ह्यात 12 ते 14 वयोगटातील मुला-मुलींच्या लसीकरणास सुरुवात

भंडारा, दि. 16 : जिल्ह्यात 12 ते 14 वयोगटातील मुला-मुलींचे कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण दि. 17 मार्च 2022 पासून सुरू होणार आहे. त्याचबरोबर 60 वर्षे वयोगटातील जेष्ठ नागरिकांचे प्रिकॉशन डोस लसीकरणास सुरवात होणार आहे.

या संदर्भात जिल्हा प्रशासनाच्या वतीने तयारी करण्यात येत असून मंगळवारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलींद सोमकुंवर तसेच जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. माधुरी माथुरकर यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे जिल्ह्यातील तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकिय अधिकारी, वैद्यकिय अधिकारी नागरी आरोग्य पथक तसेच आरोग्य सहाय्यीका यांची बैठक घेऊन 12 ते 14 वयोगटातील मुला-मुलींचे कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण आयोजनाबाबत आढावा घेऊन मार्गदर्शन करण्यात आले.

 1 जानेवारी 2008 ते 15 मार्च 2010 या कालावधीत जन्म झालेल्या सर्व मुला-मुलींना कोविड प्रतिबंधात्मक कॉर्बिव्हॅक्स लसीद्वारे लसीकरण करण्यात येणार आहे. याच लसीचा दुसरा डोस 28 दिवसानंतर देण्यात येणार असून, दि.17 मार्च 2022 ला जिल्ह्यात 10 ठिकाणी 12 ते 14 वयोगटातील मुला-मुलींचे  लसीकरणाची स्वतंत्र सोय उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्यात जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा, लाल बाहदूर शास्त्री विद्यालय भंडारा (मन्रो शाळा), उपजिल्हा रुग्णालय तुमसर, ग्रामीण रुग्णालय पवनी, उपजिल्हा रुग्णालय साकोली, ग्रामीण रुग्णालय लाखनी, ग्रामीण रुग्णालय मोहाडी, ग्रामीण रुग्णालय लाखांदूर, प्राथमिक आरोग्य केंद्र शहापूर व प्राथमिक आरोग्य केंद्र कोंढा.

 60 वर्षावरील सर्व जेष्ठ नागरिकांचे लसीकरण नियमित सुरु असलेल्या 15 वर्षावरील लसीकरण सत्रांमध्ये केले जाईल. 12 ते 14 वयोगटातील गंभीर आजारी मुला-मुलींचे लसीकरण वैद्यकिय अधिकारी यांच्या सल्ल्यानुसार लसीकरण केले जाईल. 12 ते 14 वयोगटातील मुला-मुलींचे  लसीकरण आयोजनाचे ठिकाणी वैद्यकीय अधिकारी, सामुदाय आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांसह एईएफआय किट सुसज्ज ठेवण्याच्या सुचना जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ.माधुरी माथुरकर यांनी दिल्या.

 संभाव्य चौथी कोरोनाची लाट लक्षात घेता गुरुवार पासून सुरु होणाऱ्या 12 ते 14 वयोगटातील मुला-मुलींचे जास्तीत जास्त लसीकरण करुन घेणे, तसेच दुसरा डोसचे प्रलंबित लाभार्थ्यांनी स्वत:चे  लसीकरण पूर्ण करुन लसीकरणाची गती वाढवावी, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.मिलींद सोमकुंवर यांनी केले.