कलापथकांच्या सादरीकरणाला गावक-यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद Ø शासनाच्या कल्याणकारी योजनांचा जागर  

कलापथकांच्या सादरीकरणाला गावक-यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Ø शासनाच्या कल्याणकारी योजनांचा जागर  

चंद्रपूर दि. 11 मार्च : शासनाच्या द्विवर्षपुर्तीनिमित्त माहिती व जनसंपर्क महासंचालनालय अंतर्गत जिल्हा माहिती कार्यालय, चंद्रपूरद्वारे शासनाच्या कल्याणकारी योजनांचा जागर करण्यात येत आहे. यासाठी जिल्ह्यातील तीन कलापथकाद्वारे गावागावात जनजागृती करण्यात येत असून कलापथकांच्या सादरीकरणाला गावक-यांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे.

 ‘ऐका ………हो….ऐका’अशी साद दिल्यावर कलापथकाचा कार्यक्रम बघण्यासाठी गावकरी गर्दी करीत असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात सुभेदार रामजी बहुउद्देशीय संस्था, लोकजागृती नाट्यकला, शैक्षणिक, सामाजिक संस्था आणि जनजागृती कला व क्रीडा मंडळ या तीन कलापथक संस्थांद्वारे दोन दिवसात 17 कार्यक्रम करण्यात आले आहेत. यात खालवंसपेठ, चिरोली, नलेश्वर, बाळापूर (भुज), मेडकी, घाटकूळ, वढोली, पानोरा, सुपगाव, मारोडा, बोरचंदेली, मुडझा, भुजतुकूम, आवलगाव, चेक ठाणेवासना, नवेगाव (मोरे) आणि फुटाणा या गावांचा समावेश आहे. जिल्ह्यात इतरही गावांत सदर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहेत.

सुपेगाव येथे पार पडलेल्या कार्यक्रमाला गावच्या सरपंच श्रीमती भोयर, पोलिस पाटील श्रीमती कस्तुरे, वंदना चौधरी, सरिता जुनघरे, जगदीश भोयर यांच्यासह गावातील बालकांपासून तर वयोवृध्द नागरिक उपस्थित होते.

कलापथकांच्या सादरीकरणातून प्रामुख्याने आघाडी सरकारची दोन वर्षातील कामगिरी, कोरोनाच्या संकटावर मात, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, पर्यटन, सार्वजनिक आरोग्य, आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत कोव्हीडमुळे कर्ता व्यक्ति गमाविलेल्या कुटुंबासाठी सानुग्रह अनुदान योजना, दिव्यांगाबाबतच्या योजनांची माहिती, घरकुल योजना आदींची माहिती देण्यात येत आहे. गावक-यांनी कलापथकांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहावे, आवाहन जिल्हा माहिती कार्यालयाने केले आहे.