कोविड नियमांचे उल्लंघन : ७,१०० रुपयांचा दंड वसूल  मनपाच्या तपासणी पथकाची कारवाई 

कोविड नियमांचे उल्लंघन : ७,१०० रुपयांचा दंड वसूल 

मनपाच्या तपासणी पथकाची कारवाई 

चंद्रपूर, ता. १७ : कोविड-19 विषाणुच्या प्रादुर्भावात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून, बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या संदर्भात प्रशासनाकडून प्रतिबंधात्मक उपाय म्हणून निर्बंध लागू करण्यात आले आहे. त्यानुसार चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या पथकाने तिन्ही झोनमध्ये सोमवारी मुख्य चौक, आस्थापना आणि मंगल कार्यालयाची तपासणी केली. दरम्यान, विनामास्क फिरणाऱ्या व्यक्तींसह कोविड नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांविरोधात कारवाई करीत ७ हजार १०० रुपयाचा दंड आकारण्यात आला.
 
नव्या आदेशानुसार आयुक्त विपीन पालीवाल यांच्या निर्देशान्वये मनपाच्या पथकाने मुख्य चौक, गोलबाजार, आस्थापना आणि मंगल कार्यालयाची तपासणी केली. सोमवारी झोन क्र. १ मध्ये ४२ आस्थापनांची तपासणी करण्यात आली. शिवाय मास्क न घालणाऱ्या १३ व्यक्तींवर कारवाई करून २ हजार ८०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. झोन क्र. २ मध्ये दोन आस्थापनांच्या तपासणीत कोविड नियमांचे उल्लंघन होताना आढळून आले. त्यांच्याकडून १००० रुपये दंड वसूल करण्यात आला. तसेच मास्क न घातलेल्या १० नागरिकांविरोधात कारवाई करून १,१०० रुपयांचा दंड आकारण्यात आला. तर झोन क्र. ३ मध्ये बंगाली कॅम्प चौक ते नेहरूनगरपर्यंत तपासणी करण्यात आली. यात २८ दुकाने आणि ३ मंगल कार्यालये यांचा समावेश आहे. दरम्यान मास्क न घातलेल्या ६ व्यक्तींकडून २२०० रुपये दंड वसूल करण्यात आला.
 
‘येवले अमृततुल्य’वर दंड
सार्वजनिक रस्त्यावर कचरा टाकल्या प्रकरणी शहरातील येवले अमृततुल्य या आस्थापनाविरोधात घनकचरा व्यवस्थापन अधिनियम अंतर्गत कारवाई करून १ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तसेच यापुढे सार्वजनिक ठिकाणी कचरा फेकू नये, अशी तंबीही महानगरपालिकेच्या स्वच्छता विभागाच्या पथकाने दिली.