कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाचे प्रतिबंधात्मक आदेश जारी

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर

जिल्हा प्रशासनाचे प्रतिबंधात्मक आदेश जारी

मिथुन मेश्राम सिन्देवाही – 9923155166

चंद्रपूर दि. 31 डिसेंबर : जिल्ह्यात कोविड-19 विषाणूचा फैलाव होण्यास प्रतिबंध करण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रात प्रतिबंधात्मक आदेश जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी जारी केले आहे.

खुल्या जागेतील किंवा बंदिस्त सभागृहातील लग्न समारंभामध्ये जास्तीत जास्त 50 व्यक्ती उपस्थित राहण्याची परवानगी राहील. बंदिस्त किंवा खुल्या जागेतील सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, धार्मिक आणि इतर कोणत्याही कार्यक्रमांमध्ये अधिकतम 50 व्यक्तींनाच उपस्थित राहण्याची परवानगी राहील. तर अंत्यविधीच्या कार्यक्रमांमध्ये केवळ 20 व्यक्तींनाच उपस्थित राहण्याची परवानगी राहील.

चंद्रपूर जिल्ह्याच्या भागातील पर्यटन स्थळे, जी गर्दी आकर्षित करतात अशी स्थळे, मोकळे मैदान, बगीचे, उद्यान व ईतर करमणुकीची ठिकाणे यामध्ये गर्दी आटोक्यात ठेवण्याकरिता संबंधित क्षेत्राचे उपविभागीय दंडाधिकारी हे फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 144 लागू करू शकतील.

या आदेशात नमूद केलेल्या निर्बंधाव्यतिरिक्त इतर सर्व निर्बंध जसे आहेत, तसेच लागू राहतील. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील यापूर्वीचे आदेशातील निर्बंध सुद्धा कायम असतील. यापूर्वी संदर्भीय आदेशान्वये वेळोवेळी निर्गमित केलेले कोरोना निर्बंध आदेश व मार्गदर्शक सूचना पुढील आदेशापर्यंत लागू राहतील.

कोविड-19 च्या प्रतिबंधासाठी वेळोवेळी निर्गमित करणारे आलेल्या आदेशाचे, मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन करणारी व्यक्ती आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005, तसेच भारतीय दंड संहितेच्या कलम 188 नुसार व अन्य कायदेशीर तरतुदीनुसार कायदेशीर कार्यवाहीस पात्र राहील.

सदर आदेश संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रात दिनांक 31 डिसेंबर 2021 चे रात्री 12 वाजेपासून पुढील आदेशापर्यंत लागू राहील, असे जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी निर्गमित केलेल्या आदेशात नमूद आहे.