भंडारा : जागतिक पुरुष नसबंदी पंधरवड्याचे आयोजन Ø  कुटुंब नियोजन कार्यक्रमावर लक्ष केंद्रीत करणार Ø 21 नोव्हेंबर ते 4 डिसेंबर पर्यंत  नसबंदी पंधरवडा

जागतिक पुरुष नसबंदी पंधरवड्याचे आयोजन

Ø  कुटुंब नियोजन कार्यक्रमावर लक्ष केंद्रीत करणार

Ø 21 नोव्हेंबर ते 4 डिसेंबर पर्यंत  नसबंदी पंधरवडा

भंडारा, दि. 18 : कुटुंब नियोजन कार्यक्रमावर लक्ष केंद्रित करण्यासाठी व त्यात पुरूषांचा सहभाग वाढविण्यासाठी जिल्ह्यात पुरुष नसबंदी पंधरवडा राबविण्यात येत आहे. 21 नोव्हेंबर ते 4 डिसेंबर पर्यंत जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा/ ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये हा पंधरवडा राबविण्यात येणार आहे.

 नसबंदी पंधरवडयाचा  कार्यक्रम दोन टप्प्यांमध्ये राबविण्यात येणार आहे. त्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये 21 नोव्हेंबर ते 27 नोव्हेंबर दरम्यान जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागातील आशा, आरोग्य सेविका व आरोग्य कर्मचाऱ्यांनी कार्यक्षेत्रातील योग्य जोडप्यांच्या याद्या तयार करून कुटुंबनियोजन पद्धतीमध्ये पुरुषांचा सहभाग वाढविण्यासाठी आणि त्यांच्याशी निगडित गैरसमज दूर करण्यासाठी आवश्यक प्रचार प्रसार करून या जोडप्यांना पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया चा अवलंब करण्यास प्रवृत्त करायचे आहे. जिल्हयातील आरोग्य संस्थेमध्ये पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया  सेवा उपलब्ध आहे. त्याबाबत माहिती देण्यात येणार आहे. तर दुसऱ्या टप्प्यामध्ये 28 नोव्हेंबर ते 4 डिसेंबर दरम्यान  जिल्हा रुग्णालय व शासकीय रुग्णालयामार्फत शस्त्रक्रिया गृह असलेल्या संस्थेत पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया शिबिराचे वेळापत्रकानुसार आयोजन करण्यात येणार आहे.

 शिबिरात सर्जन आणि तज्ज्ञ डॉक्टरांचे उपस्थित शस्त्रक्रीया करण्यात येणार आहेत. जागतिक पुरुष नसबंदी पंधरवाड्यात कुटुंबनियोजन पद्धतीच्या उपलब्ध असलेल्या साधनांबाबत जास्तीत जास्त समुपदेशन करून लाभार्थ्यांना पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया अवलंब करण्यास प्रवृत्त करण्यात येणार असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत उईके यांनी कळविले आहे.