शेतकऱ्यांनी कपाशीवरील गुलाबी बोंडअळीचे वेळीच व्यवस्थापन करावे

शेतकऱ्यांनी कपाशीवरील गुलाबी बोंडअळीचे वेळीच व्यवस्थापन करावे

            चंद्रपूर दि. 15 नोव्हेंबर: सध्यास्थितीत कपाशीवर गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव 2 ते 3 टक्के पर्यंत आहे. मात्र हा प्रादुर्भाव पुढे वाढण्याची शक्यता आहे. गुलाबी बोंड अळीचे मादी पतंग पात्या, फुले व बोंडावर लांबुकळी चपटी, मोत्यासारखी चकचकीत पांढरी अंडी घालतात. अंडयातून बाहेर पडलेली अळी प्रथम पांढूरकी असते व मोठी झालेली अळी गुलाबी रंगाची होते. अंडयातून बाहेर पडल्यावर अळी सुरूवातील पात्या, फुलांचे नुकसान करते व पुढील अवस्थेत बोंडात शिरते व आतील सरकी व कापूस खाऊन उपजीविका करते.

                 गुलाबी बोंड अळीचे पतंग निशावर असल्यामुळे रात्री 12 ते 4 वाजताच्या दरम्यान मिलन होऊन ते अंडी घालतात. या प्रक्रियेत गडद अंधाऱ्या रात्री जास्त वाढ होते व त्यानंतर तीन ते चार दिवसात या अंड्यातून अळ्या बाहेर पडतात. या किडीच्या वाढीसाठी दिवसाचे तापमान 29 ते 32 अंश से. व रात्रीचे तापमान 11 ते 14 अंश से., दिवसाची आर्द्रता 71 ते 80 टक्के तर रात्रीची आद्रता 26 ते 35 टक्के अत्यंत पोषक आहे. असे वातावरण ऑक्टोंबर व नोव्हेंबर महिन्यात अपेक्षित आहे. कपाशीचे 15 ते 20 दिवसाचे बोंड हे गुलाबी बोंड अळीचे आवडते खादय आहे, या सर्व कारणामुळे गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

            एकरी दोन याप्रमाणे पिकाच्या उंचीच्या वर एक फुट याप्रमाणे फेरोमन सापळे लावावे. सतत तीन दिवस या सापळयामध्ये आठ ते दहा पंतग आढळल्यास गुलाबी बोंड अळीच्या व्यवस्थापनाचे उपाय योजावे. प्रत्येक आठवडयाला एकरी शेतीचे प्रतिनीधीत्व करतील अशी 20  झाडे निवडून निवडलेल्या प्रत्येक झाडावरील फुले, पात्या व बोंडे संख्या मोजून त्यात गुलाबी बोंड अळीग्रस्त फुले, पात्या बोंडे यांची टक्केवारी काढावी व प्रादुर्भावग्रस्त ची टक्केवारी 5 टक्केपेक्षा जास्त आढळल्यास  रासायनिक कीटकनाशकाची फवारणी करावी.

कपाशीवर 3.5 ते 10 टक्के प्रादुर्भाव असल्यास इमामेक्टीन बेंन्झोएट 5 टक्के दानेदार 3.8 ते 4.4 ग्रॅम किंवा इथिऑन 50 टक्के प्रवाही 15 ते 20 मि.ली. किंवा थायोडिकार्ब 75 टक्के भुकटी 20 ग्रॅम किंवा फेनव्हलरेट 20 टक्के प्रवाही 5 मि.ली किंवा फेनव्हलरेट 20 टक्के प्रवाही 5.5 मि.लि.यापैकी कोणत्याही एका किटकनाशकाची 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. आवश्यकता भासल्यास जेथे प्रादुर्भाव 10 टक्केच्यावर आहे. अशा ठिकाणी आवश्यकतेनुसार प्रादुर्भाव पुढे वाढू नये, म्हणुन कोणत्याही एका मिश्र किटकनाशकाची 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. क्लोरॅट्रानिलीप्रोल 9.3 टक्के किंवा क्लोरपायरीफॉस 50 टक्के किंवा इंडोक्झाकार्ब 14.5 टक्के + ॲसीटामाप्रिड 7.7 टक्के टक्के 10 मिली. सद्यपरिस्थितीत बहुतांश ठिकाणी कपाशीचे पिक चार ते पाच फुट उंचीचे असुन त्याच्या फांदया हि दाटलेल्या आहेत अशा परिस्थितीत किटकनाशकाची फवारणी करतांना विषबाधा  होऊ शकते, म्हणुन कपाशीवर फवारणी करतांना कटाक्षाणे फवारणी किटचा वापर करूनच फवारणी करावी. तसेच फवारणी करतांना सकाळी व वा-यांच्या दिशेने फवारणी करावी.

                तरी, शेतकरी बंधूनी कपाशीवरील गुलाबी बोंड अळीचे योग्य व वेळीच व्यवस्थापन करावे, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी केले आहे.