कुष्ठरोगाने येणाऱ्या विकृतीवर मोफत शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन

कुष्ठरोगाने येणाऱ्या विकृतीवर मोफत शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन

चंद्रपूर दि. 3 नोव्हेंबर:  जिल्हा कुष्ठरोग कार्यालयाच्या वतीने दि. 10 ते 12 नोव्हेंबर 2021 या कालावधीत चंद्रपूर व गडचिरोली जिल्हयातील कुष्ठरोगाची विकृती असणाऱ्या रुग्णांवर तज्ञ डॉक्टरांमार्फत तपासणी करुन शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. त्याकरीता शासकिय वैद्यकिय महाविद्यालय, चंद्रपूर येथे मोफत शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन करण्यात येत आहे.
या शिबीरात विकृती रुग्णांची तज्ञ डॉक्टरांमार्फत तपासणी करण्यात येणार असुन कुष्ठरोगामुळे डोळे, हात किंवा पाय शरिराच्या या भागावर असलेल्या विकृतीवर मोफत शस्त्रक्रिया केली जाणार आहे. विकृती रुग्णांची तपासणी व अशा रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यासाठी भारत सरकारचे एम.एस.ऑर्थो सल्लागार,आर.एल.टी आर.आय रायपूर सी.जी , डॉ.कृष्णमृर्ती कांबळे व त्यांची टिम उपस्थित राहणार आहे.
विकृती रुग्णांना शिबीराच्या ठिकाणी ने-आण करण्यासाठी अॅम्बुलन्सची व्यवस्था करण्यात आली आहे. शिबीरातुन जास्तीत जास्त रुग्ण तज्ञांमार्फत तपासुन शस्त्रक्रिया करण्यासाठी अधिष्ठाता डॉ. अशोक नितनवरे यांनी वैद्यकिय महाविद्यालयाकडून औषधी व साहित्याची सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. याकरीता अर्लट इंडिया, मुंबई या निमशासकिय स्वंयसेवी संस्थेकडूनही तज्ञ लोकांची टिम विकृती रूग्णास तपासण्यासाठी उपस्थीत असणार आहे. रुग्णांच्या तपासणीअंती, काही विकृती रुग्णास शस्त्रक्रियेची गरज नसल्यास अशा विकृती रुग्णांना त्यांना आवश्यक असणारे भौतिक उपचार साधणाचे वाटप करण्यात येणार आहे.
            आपल्या कुंटूबात किंवा आपल्या परिचयात विकृती कुष्ठरुग्ण असल्यास अशा रुग्णांना शिबीरात आणुन चंद्रपूर जिल्हा, कुष्ठरुग्ण मुक्त करण्यास आपले बहुमूल्य सहकार्य करावे. याबाबत आपणास काही अडचण असल्यास तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, ग्रामीण रुग्णालय व उपजिल्हा रुग्णालय येथे कार्यरत कुष्ठरुग्ण कर्मचारी अथवा आरोग्य कर्मचारी यांच्याशी संपर्क साधावा.
तरी, या शिबीराचा लाभ घेण्यासाठी चंद्रपूर जिल्हयातील सर्व तालुक्यातील विकृती रुग्णांना घेऊन येण्याचे आवाहन, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मिताली सेठी, शासकिय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अशोक नितनवरे, जिल्हा शल्यचिकित्सक निवृत्ती राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.राजकुमार गहलोत व कुष्ठरोग कार्यालयाचे प्रमुख डॉ.संदिप गेडाम यांनी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकिय अधिकारी, ग्रामिण रुग्णालयाचे वैद्यकिय अधिक्षक, उपजिल्हा रुग्णालय व तालुका आरोग्य अधिकारी यांना केले आहे.