लसीकरणाचे उद्दीष्ट पूर्ण करण्यासाठी आरोग्य यंत्रणेने गृहभेटीवर भर द्यावा – जिल्हाधिकारी गुल्हाने

लसीकरणाचे उद्दीष्ट पूर्ण करण्यासाठी आरोग्य यंत्रणेने गृहभेटीवर भर द्यावा – जिल्हाधिकारी गुल्हाने

चंद्रपूर दि. 25 ऑक्टोबर : कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी लसीकरण करणे आवश्यक  आहे.तरी पात्र व्यक्तींचे वेळीच लसीकरण करण्यात यावे, आरोग्य कर्मचाऱ्यांनी नागरिकांच्या गृहभेटी घेऊन दुसरा डोस घेण्यास त्यांना प्रोत्साहित करावे. तसेच लसीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी यंत्रणांनीजास्तीत जास्त गृहभेटीवर भर द्यावा, असे निर्देश जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी आरोग्य यंत्रणेला दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयातील वीस कलमी सभागृहात आयोजित जिल्हा कोविड टास्क फोर्स समितीच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.
यावेळी अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा गौरकार, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत, जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. संदीप गेडाम, नगर प्रशासन विभागाचे अजितकुमार डोके तसेच आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.
जिल्ह्यात मुबलक प्रमाणात कोविड प्रतिबंधात्मक लसीचा साठा उपलब्ध आहे. असे सांगून जिल्हाधिकारी श्री. गुल्हाने म्हणाले,  ज्या नागरिकांनी अद्याप लसीकरण करून घेतले नाही, आरोग्य विभागाने अशा नागरिकांच्या दारापर्यंत  पोहोचून त्यांचे लसीकरण करून घ्यावे. जिल्ह्यात 1 लक्ष 5 हजार 333 नागरिकांचा दुसरा डोस अद्याप शिल्लक असून अशा नागरिकांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. तसेच तालुकास्तरावर ज्या नागरिकांनी  दुसरा डोस  घेतलेला नाही, अशा नागरिकांना प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत दुसरा डोस देण्याचे नियोजन करावे. असे निर्देश जिल्हाधिकारी श्री. गुल्हाने यांनी आरोग्य यंत्रणेला दिले.
ग्रामीण भागात पिकांचा कापणी हंगाम सुरू असून ग्रामीण भागातील नागरिक शेतात निघून जातात. त्यामुळे लसीकरण करणे शक्य होत नाही. ग्रामीण भागातील नागरिकांना कोविड प्रतिबंधात्मक लस वेळेत देता यावी यासाठी सकाळी  7 ते 10  या कालावधीत लसीकरण शिबिरांचे आयोजन करावे.
23 ऑक्टोंबरपर्यंत जिल्ह्यात 13 लक्ष 12 हजार 677 नागरीकांचा पहिला डोस तर 4 लक्ष 39 हजार 657 नागरिकांचे  दोन्ही डोस असे एकूण 17 लक्ष 52 हजार 334 डोस देण्यात आले आहे. जिल्ह्यात 1 लक्ष 3 हजार 875 इतका लसीचा साठा मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. त्यामुळे नागरिकांनी पुढे येऊन कोरोना प्रतिबंधात्मक लस टोचून घ्यावी.  कोविड सदृश्य लक्षणे असलेल्या, तसेच आयएलआय व सारी  रुग्णांचे नियमित टेस्टिंग करावे. मागील एक महिन्यात ज्या तालुक्याच्या कोविड तपासण्या कमी प्रमाणात झाल्या आहे, त्या तालुक्याची माहिती घ्यावी. तपासण्यांचे लक्ष निर्धारित करण्यात आले असून रोज हया कोविड तपासण्या होणे गरजेचे असल्याचे अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर यांनी यावेळी सांगितले.