जिल्हास्तरीय ऋण व प्रसार मेळाव्याव्दारे बँकेच्या योजनांचा प्रसार

जिल्हास्तरीय ऋण व प्रसार मेळाव्याव्दारे बँकेच्या योजनांचा प्रसार

भंडारा,दि.14: अर्थ मंत्रालय, भारत सरकार यांनी राबवित असलेल्या क्रेडिट आउटरीच अभियान अंतर्गत जिल्ह्यात दोन मेळाव्याचे आयोजन भंडारा अग्रणी जिला व्यवस्थापक अशोक कुंभलवार यांच्या द्वारे 8 ऑक्टोबर व 14 ऑक्टोबर 2021 रोजी करण्यात आले. कर्ज योजनेची माहिती प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचविण्याकरीता या मेळाव्याचे आयोजन आरसेटी (RSETI) भंडारा येथे सकाळी 10 ते दुपारी 5 पर्यंत करण्यात आले होते. ग्रामीण भारत, खेड्यातील भारत हा अर्थव्यवस्थेचा कणा आहे आणि अर्थव्यवस्थेला मजबूत करण्याचे कार्य बँकेचे आहे. त्याकरिता बँकेने तळागळातील जनतेपर्यंत पोहचून कर्ज योजनांची माहिती प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचविण्याकरीता या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
मेळाव्याचे उद्घाटन निवासी उपजिल्हाधिकारी महेश पाटील, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विनोद जाधव, बँक ऑफ इंडियाचे  क्षेत्रिय प्रबंधक संतोष एस. व  नाबार्डचे जिला विकास व्यवस्थापक संदीप देवगिरीकर याच्या हस्ते करण्यात आले. या मेळाव्यात आरसेटी डायरेक्टर सुजीत बोदेले, जिल्ह्यातील प्रत्येक बँकेचे जिल्हास्तरीय अधिकारी व संबंधित शासकीय कार्यालयाचे अधिकारी उपस्थित राहून बँकेच्या कर्ज योजना व शासकीय योजनांची माहिती दिली. यावेळी कर्ज प्रकरणे मंजूर झालेल्या लाभार्थ्यांस स्वीकृती प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. या मेळाव्यात विविध बँकांनी स्टॉलव्दारे योजनांची माहिती दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बैंक ऑफ इंडिया स्टार कृषि विकास केंद्राचे वरिष्ठ प्रबंधक डेविड डोंगरे यांनी केले तर उपस्थितांचे आभार मुख्य प्रबंधक बैंक ऑफ इंडिया अशोक रामटेके यांनी मानले. या कार्यक्रमात जिल्हा उद्योग केंद्राचे महाप्रबंधक श्री. बदर, कृषि विभागाचे मिलिंद लाड, माविमचे जिल्हा समन्वयक अधिकारी, नगरपरिषदेचे प्रवीण पडोळे, एमएसआरएलएमचे दिलीप पाटिल, जिल्हा उद्योग केंद्राचे एस. आर. तिवारी यांनी विविध योजनांबद्दल माहितीपर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात  विविध बँकांचे अधिकारी, बँकांचे ग्राहक व जिल्ह्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी माधव लिमजे, विनीता राउत, नत्थू सोनकुसरे, चंद्रप्रकाश श्यामकुँवर, सचिन्द्र रंगारी व आर एम चोपकर यांनी परिश्रम घेतले.