‘त्या’ भरती प्रक्रियेशी पोलीस विभागाचा संबंध नाही

‘त्या’ भरती प्रक्रियेशी पोलीस विभागाचा संबंध नाही

चंद्रपूर दि. 11 ऑक्टोबर : चंद्रपूर सारख्या दुर्गम भागातील बेरोजगार युवक-युवतींना खाजगी क्षेत्रातील रोजगाराच्या  संधी  दर्शविण्यासाठी चंद्रपूर पोलिस विभागामार्फत प्रयत्न केले जातात. एस.आय.एस (इं) सिक्युरिटीज या कंपनीमध्ये  रोजगार उपलब्ध असल्याने त्याचा फायदा या भागातील बेरोजगार युवकांना होण्यासाठी कंपनीच्या मानकाप्रमाणे या भागातही कंपनीमार्फत भरती घेण्याविषयी संबंधित कंपनीला सुचित करण्यात आले होते. त्यानुसार सदर कंपनीने चंद्रपूरच्या विविध भागात भरतीचे आयोजन केले आहे.
सदर कंपनीने वर्तमानपत्रात जाहिरात देतांना त्यात पोलिस दलाच्या संयुक्त विद्यमाने असे नमूद केले आहे. त्याद्वारे चंद्रपूर पोलिस विभागामार्फत स्पष्ट करण्यात येते की, सदर भरती प्रक्रियेशी पोलिस विभागाचा कुठलाही प्रत्यक्ष संबंध नाही. यामध्ये पोलिस विभागाची भूमिका फक्त समन्वयकाची असून या भागातील बेरोजगार युवकांना रोजगाराच्या संधी शोधून देण्यासाठी आहे.
सदर भरती संदर्भातील मानके, अहर्ता, प्रक्रिया व संबंधित शुल्क याचा पोलिस विभागाशी काहीही संबंध नाही. इच्छुक युवकांना रोजगाराबाबत कंपनीचे ध्येय-धोरण पसंत असेल त्यांनी स्वतः त्याबाबतचा निर्णय घ्यावा. या निवड प्रक्रियेशी पोलिस विभागाचा संबंध नसून सदर भरती प्रक्रिया ही शासनाच्या कोणत्याही विभागाशी संबंधित नाही. तसेच भरती प्रक्रिया पोलिस स्टेशनच्या आवारात होणार नाही. केवळ खाजगी कंपनीमार्फत राबवली जाणारी ही भरती प्रक्रिया आहे. याबाबत सर्व बेरोजगार युवक युवतींनी नोंद घ्यावी. असे आवाहन पोलिस उपअधीक्षक शेखर देशमुख यांनी केले आहे.