महापौरांनी घेतले देवी महाकालीचे दर्शन 

महापौरांनी घेतले देवी महाकालीचे दर्शन 

चंद्रपूर, ता. ८ : नवरात्रीची सुरुवात अश्विन शुद्ध प्रतिपदेला म्हणजेच ७ ऑक्टोबर पासून झाली. शुक्रवारी महापौर राखी संजय कंचर्लावार यांनी विदर्भातील अष्ट शक्तिपीठांपैकी एक असलेल्या चंद्रपूरचे आराध्य दैवत देवी महाकाली मातेचे मनोभावे दर्शन घेतले. तसेच अवघ्या चंद्रपूर शहराची सुखसमृध्दी, नागरिकांची ख्यालीखुशाली व आरोग्याचे आशीर्वचन देण्याचे साकडे त्यांनी देवीकडे घातले व चंद्रपूरकरांच्या वतीने माता महाकालीची खणा नारळाने ओटी भरली. 
यावेळी महाकाली मंदिरात कोविड लसीकरणाचा देखील शुभारंभ करण्यात आला. तसेच ऐन नवरात्रात दीर्घ कालावधीनंतर मंदिरे उघडल्यानंतर भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता महापौरांनी नागरिकांना कोरोना नियमांचे पालन करण्याचे व लसीकरण झाले नसल्यास अगत्याने लस घेण्याचे आवाहन केले. दरम्यान, महाकाले कुटुंबियांच्या वतीने आशाताई महाकाले, निमिषा महाकाले यांनी महापौरांचे स्वागत केले. यावेळी उपमहापौर राहुल पावडे, स्थायी समिती सभापती रवी आसवानी, झोन क्र. १च्या सभापती छबू वैरागडे, गटनेत्या जयश्री जुमडे यांची उपस्थिती होती.