मतमोजणी केंद्राच्या परिसरात कलम 144 लागू

मतमोजणी केंद्राच्या परिसरात कलम 144 लागू

भंडारा, दि. 17 : जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकांसाठी मतदान उद्या दिनांक 18 जानेवारी रोजी होत आहे. तसेच मतमोजणी 19 जानेवारी रोजी होणार आहे. या मतमोजणीसाठी मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर सर्व ईव्हीएम व्हीव्हीपॅट मशीन शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था तुमसर, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था मोहाडी, तहसील कार्यालय साकोली, समर्थ महाविद्यालय लाखनी येथील निवेदिता वस्तिगृह इमारतीमधील सभागृह, पोलीस बहुउद्देशीय सभागृह भंडारा, नगरपरिषद विद्यालय पवनी, तहसील कार्यालय लाखांदूर (शासकीय तांत्रिक विद्यालय), महिला आर्थिक विकास महामंडळ मोहाडी, तहसील कार्यालय लाखनी, तालुका क्रीडा संकुल सभागृह लाखांदूर येथे तयार करण्यात आलेल्या सुरक्षा कक्षात ठेवण्यात येणार आहेत. 19 जानेवारी रोजी मतमोजणी करिता या कक्षातील मशीन वापरण्यात येणार आहेत. हे ठिकाण संवेदनशील असल्यामुळे कडक बंदोबस्त लावण्यात येणार आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी 19 जानेवारी रोजी सकाळी 9 ते रात्री 24 वाजेपर्यंत जिल्हा परिषद पंचायत समिती तसेच नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक तयार करण्यात आलेल्या सुरक्षा कक्षाच्या परिसरात तसेच मतमोजणी केंद्राच्या ठिकाणी शंभर मीटर परिसरात कोणत्याही सार्वजनिक व खासगी जागेमध्ये करावयाच्या कृतींना प्रतिबंध केला आहे.

मतमोजणी केंद्राच्या ठिकाणी निवडणुकीशी संबंधित अशी कोणतीही सूचना किंवा खूण प्रदर्शित करणे. धुम्रपान करणे, घोषणा करणे, ज्वलनशिल पदार्थ नेणे. मतमोजणी केंद्राच्या ठिकाणी किंवा त्याच्या प्रवेशद्वाराजवळ कोणत्याही सार्वजनिक व खासगी जागेमध्ये ध्वनिवर्धक, ध्वनिक्षेपक सारखे मानवी आवाजाचे वर्धन करणारा उपकरण संच बसवणे. प्रतिबंधित क्षेत्राच्या बाहेरील भागावरुन ध्वनीक्षेपकांचा असा वापर करणे की, ज्यामुळे मतमोजणी केंद्रावरील निवडणूक आयोगाचे काम बाधित होऊ शकते. तसेच मतमोजणी केंद्र पासून शंभर मीटर परिसरात कोणत्याही प्रकारच्या वाहन आणणे. मतमोजणी केंद्र पासून शंभर मीटर परिसरात हॉटेल, टेलिफोन बूथ, झेरॉक्स मशीन, फेरीवाले यांनी व्यवसाय करणे. मतमोजणी केंद्रावर शंभर मीटर परिसरात मंडप उभारण्यास तसेच उमेदवारांचे प्रतिनिधी व कार्यकर्त्यांना बसण्यासाठी टेबल खुर्ची लावणे यास प्रतिबंध करण्यात येणार आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती विरुद्ध कारवाई करण्यात येईल, असे देखील जिल्हाधिकाऱ्यांनी कळवले आहे.