ओपन जीम साहित्य शासकीय नियमानुसारच समितीचा अहवाल

ओपन जीम साहित्य शासकीय नियमानुसारच समितीचा अहवाल

भंडारा, दि.04:- जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत खरेदी करण्यात आलेले ओपन जीम साहित्य क्रीडा संचालनालयाने निश्चित करुन दिलेल्या तपशीलानुसारच खरेदी करण्यात आल्याचा अहवाल प्राचार्य शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय नागपूर यांच्या समितीने सादर केला असल्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.
सन 2019-20 या आर्थिक वर्षाकरिता जिल्हा नियोजन समिती मार्फत मंजूर करण्यात आलेल्या निधीमधून भंडारा जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थाना बंदिस्त व्यायाम साहित्य व खुली व्यायाम साहित्य पुरवठा करण्यासाठी मे सुमित स्पोर्ट्स पुणे यांना आदेश निर्गमित करण्यात आलेले आहे. मे सुमित स्पोर्ट्स पुणे यांना भंडारा जिल्ह्यातील 95 स्थानिक स्वराज्य संस्थांना खुली व्यायाम साहित्य स्थापित करणेबाबत आदेशित करण्यात आले होते. त्यापैकी 35 स्थानिक स्वराज्य संस्थाच्या ठिकाणी खुली व्यायाम साहित्य स्थापित केलेले आहे. या स्थापित केलेल्या साहित्याच्या दर्जा बाबत वर्तमानपत्रात बातम्या प्रसिध्द झाल्या होत्या. त्या अनुषंगाने प्राचार्य शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय नागपूर यांना तांत्रिकदृष्ट्या तपासणी करुन अहवाल देण्याबाबत विनंती केली असता मे सुमित स्पोर्ट्स पुणे यांना परिशिष्ट ब मध्ये नमुद केलेल्या दर्जा व स्पेशिफिकेशननुसार खुली व्यायाम साहित्याचा पुरवठा केल्याचे स्पष्ट नमुद केले आहे.
सदर साहित्य खरेदी करतांना संपूर्ण पारदर्शकतेचे पालन करण्यात आले असून क्रीडा संचालनालयाने निश्चित करुन दिलेल्या स्पेसिफिकेशननुसार व संबंधित शासन निर्णयानुसार कार्यवाही करुन साहित्य खरेदी करण्यात आलेले आहे. असे जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.