लसीकरण कमी असलेल्या गावांवर लक्ष केंद्रित करा -जिल्हाधिकारी संदीप कदम

लसीकरण कमी असलेल्या गावांवर लक्ष केंद्रित करा

-जिल्हाधिकारी संदीप कदम

  • 30 तारखेला 224 ठिकाणी लसीकरण

  • 84 हजार लसीकरणाचे उदिष्ट

भंडारा,दि.29:-  कोविड 19 लसीकरणासाठी अनेक गावात उत्तम प्रतिसाद मिळत असला तरी काही गावात लसीकरणाची टक्केवारी कमी आढळून येत आहे. ज्या गावात व शहरात लसीकरण कमी आहे. अशा गावात प्राधान्याने लस देण्यासाठी 30 सप्टेंबर 2021 रोजी विशेष अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानात जिल्ह्यात 224 ठिकाणी लसीकरण करण्यात येणार असून यावेळी कमी लसीकरण असलेल्या गावांवर विशेष लक्ष केंद्रित करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी दिल्या आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात लसीकरण आढावा बैठक घेण्यात आली त्यावेळी ते बोलत होते. उपजिल्हाधिकारी अर्चना यादव, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत उईके, डॉ. माधूरी माथुरकर यावेळी उपस्थित होते. ज्या गावात लसीकरण कमी आहे त्या ठिकाणी विशेष लसीकरण सेशन लावण्यात यावेत अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी बैठकीत केल्या. यावर 30 सप्टेंबर रोजी लसीकरण केंद्र लावण्यात येतील, असे आरोग्य विभागाने सांगितले.

शहरी भागातील लाखनी, लाखांदूर व साकोली या शहरात लसीकरणावर भर देण्यात यावा. भंडारा जिल्ह्यात पहिला डोस घेणाऱ्या नागरिकांची संख्या 7 लाख 59 हजार 520 व दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या 2 लाख 84 हजार 639 एवढी आहे. पहिला व दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या 10 लाख 44 हजार 159 एवढी आहे. कमी लसीकरण असलेल्या गावात 90 टक्क्यांपेक्षा जास्त लसीकरणाचे उद्दिष्ट ठेवण्यात यावे असे ते म्हणाले. गरज पडल्यास एका गावात एकापेक्षा अधिक केंद्र देण्यात यावे. यासाठी लागणारे मनुष्यबळ उपलब्ध करुन देण्यात येईल.

 

लसीकरणासाठी 30 सप्टेंबर रोजीचे नियोजन

अ.क्र.तालुकालसीकरण केंद्रपहिला डोस उद्दिष्ट
1भंडारा5022294
2लाखांदूर3212365
3लाखनी225135
4साकोली217734
5मोहाडी2714084
6पवनी327918
7तुमसर4014539
एकुण22484069