स्थायी समितीच्या नव्या आठ सदस्यांची निवड

स्थायी समितीच्या नव्या
आठ सदस्यांची निवड

चंद्रपूर, ता. ३० : चंद्रपूर शहर महापालिकेच्या स्थायी समितीच्या नव्या आठ सदस्यांची निवड झाल्याची घोषणा महापौर राखी संजय कंचर्लावार यांनी महानगरपालिकेच्या आमसभेत केली.

चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या नवीन प्रशासकीय इमारतीत गुरुवारी (ता. ३०) राणी हिराई सभागृहात आमसभा पार पडली. यावेळी उपमहापौर राहुल पावडे, स्थायी समिती सभापती रवी आसवानी, आयुक्त राजेश मोहिते यांची उपस्थिती होती.

चंद्रपूर मनपाच्या १६ सदस्यीय स्थायी समितीतील आठ सदस्य निवृत्त झाले. त्यांच्या जागी नव्या सदस्यांची निवड व्हावी, यासाठी महापौरांनी पक्षीय बलाबल नुसार आपल्या पक्षाच्या सदस्यांची नावे पक्षाच्या गटनेत्यांनी बंद लखोट्यात द्यावीत, असे आवाहन केले होते. त्यानुसार भाजपच्या गटनेत्या जयश्री जुमडे यांनी तीन सदस्यांची नावे दिलीत. यात संदीप आवारी, संजय कंचर्लावार, स्वामी कनकम यांची नावे आहेत. काँग्रेसचे गटनेते डॉ. सुरेश महाकुलकर यांनी नंदू नागरकर, अशोक नागापूरे यांची नावे दिलीत, तर बहुजन समाज पक्षाने अनिल रामटेके, धनराज सावरकर यांचे, तर शहर विकास आघाडीतर्फे पप्पू देशमुख यांची स्थायी समितीच्या सदस्यपदी निवड केली असल्याचे लेखी पत्र महापौरांकडे सादर केले होते. या सदस्यांची स्थायी समिती सदस्यपदी निवड झाल्याची घोषणा महापौरांनी केली. नव्या निवड झालेल्या आठ स्थायी समितीच्या सदस्यांची नावे नगरविकास विभागाकडे माहितीसाठी पाठविल्यानंतर पुढील बैठकीत स्थायी समिती सभापतींची निवड होणार आहे.