जटपुरा वार्डात संत जगनाडे महाराज सभागृह, सभामंडप, बालोद्यान व इतर विकासकामांचे लोकार्पण 

जटपुरा वार्डात संत जगनाडे महाराज सभागृह, सभामंडप, बालोद्यान व इतर विकासकामांचे लोकार्पण 

 

चंद्रपूर, ता. २६ : शहरातील जटपुरा वार्ड येथील पंचतेली समाज हनुमान मंदिर परिसरातील सभामंडप, जटपुरा बालोद्यान तसेच मित्रनगर चौक व हुतात्मा चौकातील सौंदर्यीकरणाचा लोकार्पण सोहळा व संत जगनाडे महाराज सभागृहाचे उद्घाटन २५ सप्‍टेंबरला माजी अर्थमंत्री व विधिमंडळ लोकलेखा समितीचे अध्यक्ष आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते पार पडले. याप्रसंगी जटपुरा प्रभागातील जेष्ठ नागरिकांचा मान्यवरांच्या पाहुण्यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार देखील करण्यात आला. पंचतेली समाज हनुमान मंदिर परिसरातील सभामंडप व जटपुरा बालोद्यान यांची  निर्मिती आ. सुधीर मुनगंटीवार यांनी आमदार निधीतून मंजूर केलेल्या ५० लक्ष रुपयांच्या निधीतूनच झाली आहेत.
या लोकार्पण सोहळ्याला महापौर राखी संजय कंचर्लावार, भाजपा जिल्‍हाध्‍यक्ष देवराव भोंगळे, महानगर जिल्‍हाध्‍यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, उपमहापौर राहूल पावडे, स्‍थायी समिती सभापती रवि आसवानी, मनपा सभागृह नेते संदीप आवारी, माजी महापौर सौ. अंजली घोटेकर, ब्रिजभूषण पाझारे, नगरसेवक सुभाष कासनगोटटूवार, प्रकाश धारणे, मनपा गटनेता जयश्री जुमडे, जटपुरा प्रभागाच्या नगरसेविका तसेच झोन १च्या सभापती छबूताई वैरागडे आणि जटपुरा प्रभागाचे नगरसेवक अॅड. राहूल घोटेकर, नगरसेविका शितल आत्राम यांची प्रामुख्‍याने उपस्थिती होती.
आपल्या संबोधनात आ. सुधीर मुनगंटीवार म्‍हणाले की, अर्थमंत्री पदाच्‍या कार्यकाळात चंद्रपूर शहराचा चेहरा मोहरा बदलवत अनेक महत्‍वपूर्ण विकासकामे पूर्णत्‍वास नेली. महापालिकेच्या माध्यमातून मागील पाच वर्षांत चंद्रपूर शहरात १५ पेक्षा अधिक बालोद्यानांची निर्मीती झाली. पंचतेली हनुमान मंदीर समितीला आपण यापुढेही आवश्यक ती मदत करणार असल्‍याचे आ. मुनगंटीवार यावेळी म्‍हणाले. नगरसेविका छबू वैरागडे यांच्‍या कार्यशैलीचे त्‍यांनी विशेष कौतुक केले.जेष्ठांच्या सत्कार सोहळ्याचा देखील त्यांनी विशेष उल्लेख केला. चंद्रपूर शहराचे महापौर, उपमहापौर, सर्व नगरसेवक एकत्रितपणे नगरातील विकासकामांसाठी झटत असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी महापौर सौ. राखी कंचर्लावार यांचेही भाषण झाले. चंद्रपूर शहराच्‍या सर्वांगिण विकासासाठी भारतीय जनता पार्टी सदैव कटिबध्‍द असल्‍यचे प्रतिपादन महापौरांनी यावेळी केले. जटपुरा प्रभागाच्या सर्व नगरसेवकांनी विकासकामांसाठी सातत्याने पाठपुरावा केल्याचे त्या म्हणाल्या. आ. सुधीर मुनगंटीवार आणि महापौर म्हणून मी विकासकामांसाठी निधी उपलब्ध करून दिला असेल पण ती कामे प्रत्यक्षात उतरवण्याचे काम जटपुरा प्रभागातील नगरसेवकांनी केल्याचे त्या म्हणाल्या.
प्रास्‍ताविकपर भाषण प्रणिता जुमडे यांनी केले. त्यांनी सांगितले की, छबूताई व इतर नगरसेवकांनी आ. सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे विकासासंदर्भात जी मागणी केली ती सुधीरभाऊंनी प्राधान्‍याने पूर्ण केली. नागरिकांनी विकासाबाबत मागणी करायची आणि सुधीरभाऊंनी ती पूर्ण करायची असे समीकरणच चंद्रपूर महानगरात निर्माण झाले आहे. संत जगनाडे महाराज यांच्यावरील टपाल तिकीट हे सुधीरभाऊंच्या पाठपुराव्यामुळे निघाल्याचा दाखला देत आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या कार्यकाळातील विकासकामांचा संक्षिप्त आढावा देखील त्यांनी घेतला. कार्यक्रमाचे दिलखुलास संचालन प्रज्ञा जीवनकर यांनी केले.
कार्यक्रमाला सर्व भाजपा नगरसेवक, नगरसेविका, भाजपा पदाधिकारी, पंचतेली हनुमान मंदीराचे पदाधिकारी, ज्‍येष्‍ठ नागरिक यांची उपस्थिती होती.