जादूटोणा विरोधी कायदा जनजागृतीसाठी सामाजिक संस्थांनी पुढे येण्याचे आवाहन

जादूटोणा विरोधी कायदा जनजागृतीसाठी

सामाजिक संस्थांनी पुढे येण्याचे आवाहन

चंद्रपूर दि.23 सप्टेंबर : समाजात काही अनिष्ट, अघोरी अमानुष संस्कारातून रुजलेल्या अनेक गैरसमजुतीमुळे समाजाचे अतोनात नुकसान होत असल्याचे दिसून येत आहे. लाखो माणसांचे जीव वाचविण्यासाठी, त्यांचे होणारे शोषण व छळ थांबविण्यासाठी तसेच समाजाचे मानसिक स्वास्थ्य सुधारण्यासाठी शासनाने दि. 20 डिसेंबर 2013 रोजी महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा, जादूटोणा यांना प्रतिबंध घालण्याबाबत व त्याचे समूळ उच्चाटन करण्यासाठी अधिनियम-2013 जारी करण्यात आला आहे.

जादूटोणा विरोधी कायद्यामुळे लाखो माणसांचा होणारा छळ व शोषणापासून त्यांचे जीव वाचणार आहे. त्याकरीता समाजप्रबोधन करून राज्यातील सामान्य जनतेच्या मनातील गैरसमजुती दूर करणे गरजेचे आहे. संस्कारातून रुजलेल्या गैरसमजुतीमुळे जातीयता, उच्चनीचता, गटपंथामधील परस्पर द्वेष, स्त्री-पुरुष असमानता, दारिद्र अशा मानवतेसाठी घातक असणाऱ्या गोष्टी अजूनही समाजात अस्तित्वात आहे. त्यात बदल होणे आवश्यक असून त्यासाठी जादूटोणा विरोधी कायद्याचा प्रचार-प्रसारासह त्याची प्रभावी अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. त्याअनुषंगाने जादूटोणा विरोधी कायदा जनजागृती प्रचार आणि प्रसार कार्यक्रम घेण्यासाठी सामाजिक संस्थांनी पुढे यावे, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त अमोल यावलीकर यांनी केले आहे.