नागरिकांनी वर्षातून तीन ते चार वेळा स्वेच्छेने रक्तदान करावे – जिल्हाधिकारी अजय गुल्हाणे

जिल्हाधिकाऱ्यांच्या पुढाकाराने उद्योग समूहात रक्तदान शिबिराचा श्रीगणेशा

नागरिकांनी वर्षातून तीन ते चार वेळा स्वेच्छेने रक्तदान करावे – जिल्हाधिकारी अजय गुल्हाणे

चंद्रपूर दि. 11 सप्टेंबर: सद्यस्थितीत कोरोना सदृश्य परिस्थिती तसेच कोविड लसीकरणामुळे रक्तदानावर विपरीत परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. परिणामतः रक्तपेढीतील रक्त साठ्यांमध्ये कमतरता जाणवायला लागली होती. याकरिता जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी पुढाकार घेऊन चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व उद्योगसमूहांची व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आढावा बैठक घेतली.  व त्याद्वारे सर्वांना स्वेच्छा रक्तदान शिबिराचे आयोजन करून या राष्ट्रीय कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले होते.
जिल्ह्यातील सर्व उद्योगसमूहाने जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत वर्षभर रक्तदान शिबिर आयोजित करण्याची आखणी केली. या व्हिडीओ कॉन्फरन्सिंग सभेचा परिपाक म्हणून सर्वप्रथम जिल्ह्यातील  धारिवाल इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. या उद्योग समूहाने स्वेच्छा रक्तदान शिबिराचा नुकताच श्रीगणेशा केला. सदर रक्तदान शिबिराचे उद्घाटन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांच्या हस्ते करण्यात आले.
सदर कार्यक्रमाप्रसंगी जिल्हाधिकारी यांनी सर्व रक्तदात्यांना मार्गदर्शन करून वर्षातून तीन ते चार वेळा रक्तदान करण्याचे आवाहन केले. या रक्तदान शिबिरात धारीवाल इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लिमि.चे प्रमुख भास्कर गागुंली, जनरल मॅनेजर सौमीन बानिया, अतुल गोयल तसेच एच.आर. प्रमुख दिनेश गाखर, संदीप मुखर्जी प्रामुख्याने उपस्थित होते. रक्तदान शिबिर यशस्वी करण्याकरिता प्रकल्पाचे अधिकारी डॉ. अनिश नायर, लीना पिपरोडे तसेच इतर अधिकारी यांनी अथक परिश्रम घेतले.
सदर शिबिरात एकूण 120 रक्तदात्यांनी रक्तदान करून या राष्ट्रीय कार्यक्रमात सहयोग दिला. या रक्तदान शिबिराचे यशस्वी आयोजन करण्याकरिता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, चंद्रपूर येथील रक्त संक्रमण अधिकारी डॉ. अनंत हजारे यांच्या मार्गदर्शनात रक्तपेढीचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अंकुश खिचडे, समाजसेवा अधिकारी संजय गावित,  प्रयोगशाळा तंत्रज्ञ अमोल जिद्देवार, जयवंत पचारे, रोशन भोयर, परिचारक योगेश जारोंडे,  परिचर चेतन वैरागडे, साहिल, अभिजित यांनी रक्त संकलन केले.