उद्योग समुहांनी रक्तदान शिबिरासाठी पुढाकार घ्यावा – जिल्हाधिकारी Ø व्हीसीद्वारे घेतला आढावा

उद्योग समुहांनी रक्तदान शिबिरासाठी पुढाकार घ्यावा – जिल्हाधिकारी

Ø व्हीसीद्वारे घेतला आढावा

चंद्रपूर, दि. 1 सप्टेंबर : जिल्ह्यात कोरोनासदृश्य परिस्थिती तसेच कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण सुरू असल्यामुळे रक्तदान करण्याच्या प्रमाणात लक्षणीय घट झाली आहे. शासकीय रक्तपेढीत रोज जवळपास 50 रक्तपिशव्यांची मागणी होत असते. मात्र सद्यस्थितीत शासकीय रक्तपेढीत रक्ताची कमतरता भासत आहे. चंद्रपूर जिल्हा हा औद्योगिकदृष्ट्या प्रगत असल्यामुळे जिल्ह्यातील मोठ्या उद्योगसमुहांनी या संकटावर मात करण्यासाठी रक्तदान शिबिरांचे आयोजन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात व्हीसीद्वारे जिल्ह्यातील उद्योग समुहांसोबत संवाद साधतांना ते बोलत होते. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक स्वप्नील राठोड, रक्त संक्रमण अधिकारी डॉ. अनंत हजारे आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी पुढे म्हणाले, रक्तदानासारख्या राष्ट्रीय कार्यक्रमात जिल्ह्यातील उद्योग समुहांनी हातभार लावला तर रक्ताची कमतरता भासणार नाही. यावर सर्व उद्योग समुहांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून महिन्याकाठी 1500 ते 2000 रक्तपिशव्या संकलन करण्याबाबत आश्वस्त केले आहे. त्यानुसार वर्षभराचा कृती आराखडा तयार करण्याचे नियोजन करण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले.
यावेळी व्हीसीद्वारे चंद्रपूर एमआयडीसी इंडस्ट्रिज असोसिएशनचे अध्यक्ष मधूसुदन रुंगठा यांच्यासह माणिकगड सिमेंट उद्योग, अंबुजा सिमेंट, एसीसी सिमेंट, अल्ट्राटेक सिमेंट, दालमिया सिमेंट, चंद्रपूर, वणी क्षेत्रातील वेस्टर्न कोल्ड फिल्ड, चंद्रपूर औष्णिक विद्युत केंद्र, महा. इलेक्ट्रोस्मेल्ट लिमिटेड, जी.एम.आर. गृप लिमिटेड, धारीवाल इन्फ्रास्ट्रक्चर लिमि., लॉयड्स मेटल ॲन्ड इंजिनियरींग लिमि., गोपानी आयर्न ॲन्ड पॉवर प्रा. लिमि., बिल्ट ग्राफिक्स पेपर प्रॉडक्टस्‍, ग्रेस इंडस्ट्रिज लिमि., राजुरा स्टील प्रा. लिमि., मल्टी ऑर्गनिक प्रा. लि, चमन मेटॅलिक प्रा. लिमिटेडचे व्यवस्थापक उपस्थित होते.