भंडारा : प्लास्टिकचा राष्ट्रध्वज वापरू नये राष्ट्रध्वजाचा सन्मान राखावा – जिल्हाधिकारी

प्लास्टिकचा राष्ट्रध्वज वापरू नये राष्ट्रध्वजाचा सन्मान राखावा – जिल्हाधिकारी

भंडारा, दि.10 : राष्ट्रीय सण असलेल्या स्वातंत्र्यदिनी प्लास्टिक ध्वजांचा वापर केला जातो. सोहळ्यानंतर राष्ट्रध्वज कुठेही पडलेले आढळतात. यातून देशाच्या राष्ट्रध्वजाचा अवमान होतो. यामुळे स्वातंत्र्यदिनी राष्ट्रध्वजाचा उचित सन्मान राखला जावा यासाठी प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाचा वापर करू नका, असे आवाहन जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी केले आहे.

शालेय विद्यार्थ्यांकडून तसेच नागरिकांकडूनही कागदाच्या व प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाचा स्वातंत्र्यदिनी अथवा महत्त्वाच्या सांस्कृतिक कार्यक्रमात वापर करण्यात येतो. मात्र, कार्यक्रम संपल्यानंतर प्लास्टिकचे वा कागदाचे राष्ट्रध्वज मैदानात, रस्त्यावर तसेच कार्यक्रमाच्या ठिकाणी इतरत्र पडलेले असतात. हे राष्ट्रध्वज पायदळी तुडविले जातात. त्यामुळे राष्ट्रध्वजाचा अवमान होतो. हे टाळण्याकरीता मा. उच्च न्यायालयाने प्लास्टिक व कागदी वापरावर बंदीचे निर्णय दिले आहे.

शासनाच्या 1 जानेवारी 2015 च्या शासन निर्णयानुसार प्लास्टिक व कागदी राष्ट्रध्वज निर्मितीस पायबंद घालण्याच्या दृष्टीने त्याचे उत्पादन, वितरण व विक्रेते यांच्यावर संबंधित विभागाने कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. त्याचप्रमाणे कार्यक्रम संपल्यानंतर ठिकठिकाणी पडलेले राष्ट्रध्वज गोळा करून त्याची योग्यप्रकारे विल्हेवाट लावण्याच्या सूचना न्यायालयाने दिल्या आहेत. खराब झालेले राष्ट्रध्वज पिशवी किंवा कापडामध्ये व्यवस्थित बांधून सुर्यास्तानंतर व सुर्योदयापुर्वी जिल्हाधिकारी व तहसिल कार्यालयामध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीत स्वच्छ जागेत सन्मानपुर्वक नष्ट करण्यात यावेत. तसे करतांना सर्वानी उभे रहावे व ते पुर्णपणे जाळून नष्ट होईपर्यंत कुणीही जागा सोडू नये, असे निर्देशही देण्यात आले आहे. रस्त्यावर पडलेले राष्ट्रध्वज गोळा करण्यासाठी जिल्ह्यातील सामाजिक संघटना, नागरिक, विद्यार्थी यांनी सहकार्य करावे. जमा करण्यात आलेले राष्ट्रध्वज जिल्हाधिकारी किंवा संबंधित तहसिल कार्यालयात सुपूर्द करण्यात यावे, असे जिल्हाधिकारी यांनी कळविले आहे