भंडारा : कोविड लसीकरणाची गती वाढवा   – जिल्हाधिकारी संदीप कदम

कोविड लसीकरणाची गती वाढवा  – जिल्हाधिकारी संदीप कदम

  • दुसरा डोस प्राधान्याने घ्या
  • लसीकरणासाठी विशेष शिबीर

            भंडारा,दि.5:- कोरोनाचा प्रादूर्भाव कमी होत असला तरी तिसऱ्या लाटेचा धोका सातत्याने व्यक्त केला जात आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कोविड लसीकरणाची गती वाढविण्याच्या सूचना जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी दिल्या आहेत. लसीकरण कृती दलाची आज जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते. निवासी उपजिल्हाधिकारी शिवराज पडोळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आर. एस. फारुकी, डॉ. माधूरी माथुरकर व विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

            या बैठकीत सुरूवातीला लसीकरणाचा आढावा घेण्यात आला. जिल्ह्याला 9 लाख 65 हजार 507 लाभार्थ्यांच्या लसीकरणाचे उद्दिष्ट असून त्यापैकी 4 लाख 6 हजार 331 व्यक्तींनी पहिला तर 1 लाख 38 हजार 341 व्यक्तींनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे. जिल्ह्याला आतापर्यंत कोविशिल्ड लसीचे 3 लाख 24 हजार 860 व कोव्हॅक्सिन लसीचे 2 लाख 49 हजार 370 असे एकुण 5 लाख 74 हजार 230 डोस प्राप्त झाले आहेत. कोविशिल्डचे 3 लाख 11 हजार 860 व कोव्हॅक्सिनचे 1 लाख 87 हजार 370 डोस लाभार्थ्यांना देण्यात आले आहेत. सध्या जिल्ह्यात कोविशिल्डचे 13 हजार व कोव्हॅक्सिनचे 62 हजार असे एकुण 75 हजार डोस उपलब्ध आहेत.

            कोरोना विषाणूशी लढा देण्यासाठी आपल्या शरीरात प्रतिकार वाढविण्याचे काम ही लस करते. त्यामुळे लसीचे दोन्ही डोस घेणे आवश्यकच आहे. असे असतांनाही 21 हजार 255 लाभार्थ्यांनी कोविशिल्डचा तर 42 हजार 261 लाभार्थ्यांनी कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस अद्याप घेतला नाही. पहिला डोस घेणाऱ्यांनी दुसरा डोस घेण आवश्यक असून तो प्राधान्याने घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले.

            गरोदर माता, प्रसूत माता, दिव्यांग व्यक्ती व अंथरुणाला खिळून असलेल्या व्यक्तींच्या लसीकरणाला प्राधान्य देण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी आरोग्य विभागाला दिले. जिल्ह्यात 9 हजार 608 दिव्यांग व्यक्तींच्या लसीकरणाचे उद्दिष्ट असून त्यापैकी 1 हजार 867 व्यक्तींनी पहिला तर 229 व्यक्तींनी दुसरा डोस घेतलेला आहे. दिव्यांग व्यक्तींच्या लसीकरणाची सुध्दा गती वाढविण्यात यावी असे त्यांनी बैठकीत सांगितले.

            ब्रेक द चेन अंतर्गत व्यापार व्यवसाय रात्री 8 वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. सर्व व्यापारी व दुकानदारांसाठी आपल्याकडे असलेल्या नौकरदार व्यक्तींचे लसीकरण करुन घेणे गरजेचे आहे, असे जिल्हाधिकारी म्हणाले. तसे औद्योगिक प्रशिक्षण संस्था सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. या ठिकाणीसुध्दा विद्यार्थ्यांचे लसीकरण प्राध्यान्याने करण्यात यावे.

            11 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट दरम्यान लसीकरणासाठी विशेष शिबीर आयोजित करण्यात आले आहेत. 11 ऑगस्‍टला पोलीस मुख्यालय, 12 ला बीटीबी मार्केट व एमएसईबी कार्यालय, 14 ला जिल्हा बँक व आनंद मंगल कार्यालय आणि 17 ऑगस्टला नगर परिषद या ठिकाणी विशेष लसीकरण शिबीर आयोजित केले आहे. या शिबीराचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले.