दहा वर्षापूर्वीच्या आधारकार्डचे अद्यावतीकरण करण्याचे जिल्हाधिकारी यांचे आवाहन

दहा वर्षापूर्वीच्या आधारकार्डचे अद्यावतीकरण करण्याचे जिल्हाधिकारी यांचे आवाहन

 

भंडारा, दि. 21 : दहा वर्षांपूर्वीच्या आधार कार्डचे अद्यापही अद्यावतीकरण केले नसलेल्या नागरिकांनी तात्काळ ही प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी केले आहे.

 

शासनाने आधार अद्यावतीकरण करण्याच्या सूचना केल्या आहेत. परंतु आतापर्यंत खूप कमी नागरिकांनी आधार अद्यावतीकरण केले आहे. केंद्र तसेच राज्य शासनाच्या जवळपास सर्व शासकीय योजनामध्ये आधार हे महत्त्वाचे कागदपत्र आहे. सर्वांचे आधार अचूक असावेत, यासाठी शासनाने पुढाकार घेतला आहे.

 

आधार कार्डवरील पत्ता, मोबाईल क्रमांक अपडेट असणे आवश्यक आहे. 10 वर्षापूर्वी ज्यांनी आधार कार्ड काढले, त्या वेळचा पत्ता ही तोच आहे, मोबाईल क्रमांक ही बदलला नाही, अशा नागरिकांनाही आता ऑनलाईन व्हेरिफिकेशन करावे लागणार आहे. आधारच्या संकेतस्थळावरून https://uidai.gov.in/ किंवा myaadhaar वर जाऊन आधार ऑनलाईन अपडेट केल्यास 14 जून पर्यंत कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही. तसेच आपले सरकार सेवा केंद्रावर 50 रुपये शुल्क आकारले जाईल.

 

जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांच्या मार्गदर्शनाखाली व निवासी उपजिल्हाधिकारी तथा नोडल अधिकारी अर्चना यादव यांच्या नियंत्रणाखाली जिल्ह्यातील दहा वर्षांपूर्वीच्या आधार कार्डच्या अद्यावतीकरणाची ही सर्व प्रक्रिया पार पाडण्यात येत आहे.