चंद्रपूर : बेघर व अत्याचारग्रस्त वृद्ध व्यक्तींची काळजी घेण्यासाठी राष्ट्रीय हेल्पलाईन 14567 टोल फ्री क्रमांक कार्यान्वित

बेघर व अत्याचारग्रस्त वृद्ध व्यक्तींची काळजी घेण्यासाठी

राष्ट्रीय हेल्पलाईन 14567 टोल फ्री क्रमांक कार्यान्वित

चंद्रपूर दिनांक 29 जुलै : भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालयामार्फत देशातील ज्येष्ठ नागरिकांच्या विविध समस्या निवारणासाठी सर्व राज्यात 14567 राष्ट्रीय हेल्पलाइन टोल फ्री क्रमांक कार्यान्वित करण्यात आला आहे. यासाठी राष्ट्रीय समाज रक्षा संस्थान, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग आणि जनसेवा फाउंडेशन, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र राज्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी ( वयोमर्यादा 60 वर्ष) राष्ट्रीय हेल्पलाईन, जनसेवा फाउंडेशनतर्फे चालविली जात आहे.

सदर हेल्पलाईनचा उद्देश नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी, ज्येष्ठ नागरिकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडविणे. तसेच अत्याचारग्रस्त वृद्ध व्यक्तींची काळजी घेण्यासाठी व इतर सेवेसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या समस्या तसेच तक्रार निवारणासाठी 14567 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी मनोहर गव्हाड यांनी केले आहे.