भंडारा : कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देण्यासाठी समतादूत करणार युवा गटांची निर्मिती

कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देण्यासाठी

समतादूत करणार युवा गटांची निर्मिती

भंडारा,दि.28: सामाजिक न्याय विभागामार्फत युवकांना रोजगाराभिमुख कौशल्य विकास प्रशिक्षण  देण्यासाठी विभागातील समतादूतांच्यामार्फत युवा गटांची निर्मिती करण्यात येत आहे.

समाजकल्याण विभागाचे आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या निर्देशानूसार डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) अंतर्गत नागपूर विभागात कार्यरत समतादूतांच्यामार्फत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील 18 ते 45 वयोगटातील तरुण-तरुणीचे युवागट निर्माण करण्यात येईल. त्यांच्यामार्फत सामाजिक न्याय विभागाच्या योजना प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे. त्यासोबतच त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, यासाठी स्वयंसहायता युवा गट स्थापन करून त्यांना प्रशिक्षित करण्यात येणार आहेत. अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील युवक-युवतींनी आपापल्या तालुक्यातील संस्थांच्या माध्यमातून युवागट तयार करण्याचे आवाहन प्रादेशिक उपायुक्त डॉ. सिद्धार्थ गायकवाड यांनी केले आहे.

अधिक माहितीसाठी आपले जिल्ह्यातील प्रकल्प अधिकारी किंवा समतादूत यांच्याशी किंवा 0712-2981991 या दूरध्वनी क्रमांकावर  संपर्क साधण्याचे श्री. गायकवाड यांनी कळवले आहे.