भंडारा : शहीद कुटुंबियांचे प्रश्न निकाली काढण्यासाठी प्रयत्न करणार   -शिवराज पडोळे

शहीद कुटुंबियांचे प्रश्न निकाली काढण्यासाठी प्रयत्न करणार -शिवराज पडोळे

भंडारा,दि.28:- सैनिक देशातील जनतेच्या प्राणांचे रक्षण करतात. वीरमाता व वीरपत्नी यांच्या घरातील सदस्यांनी देशासाठी सर्वोच्च बलिदान दिले आहे त्यांना जीवनात अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. त्यामुळे त्यांचे प्रश्न सोडविणे ही आपली नैतिक जबाबदारी आहे. जिल्हा पातळीवरील, राज्य किंवा केंद्र पातळीवरील कामे तात्काळ निकाली काढण्यासाठी प्रयत्न केले जातील अशी ग्वाही अतिरिक्त जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी शिवराज पडोळे यांनी दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयात (दि.26) रोजी 22 वा कारगिल विजय दिवस कार्यक्रम साजरा करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. ॲड किशोर लांजेवार, रामचंद्र कारेमोरे, विजय भूते, देवेंद्र कावळे प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित होते तसेच जिल्ह्यातील वीरमाता, वीरपत्नी व माजी सैनिक तसेच शासकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

            कार्यक्रमाच्या सुरूवातीस शहिद जवानांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. तसेच जिल्ह्यातील वीरमाता व वीरपत्नींचा पुष्पगुच्छ व साडीचोळी देवून सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे आभार वरिष्ठ लिपीक सुधाकर लुटे यांनी मानले तसेच कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडल्याबद्दल कल्याण संघटक सुरेश घनमारे, राजेश उपरकर यांचे अभिनंदन केले.