भंडारा : खावटी अनुदान योजनेंतर्गत अन्नधान्य किट वाटप   

खावटी अनुदान योजनेंतर्गत अन्नधान्य किट वाटप   

भंडारा, दि.27:- कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे राज्यात टाळेबंदी लागू करण्यात आली. या टाळेबंदीमुळे गोर गरीब नागरिकांचा रोजगार बुडाला. त्यामुळे राज्य शासनातर्फे अनुसूचित जमातीच्या गरजू लाभार्थ्यांकरिता खावटी अनुदान योजना सुरू करण्यात आली. या योजनेमध्ये दोन हजार रुपये थेट डीबीटी मार्फत लाभार्थ्याच्या बँक खात्यात व  दोन हजार रुपये किंमतीच्या जीवनावश्यक वस्तूंच्या (अन्नधान्य) किटचे वाटप एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प भंडारा व्दारे लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरुपात आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.

जिल्हा परिषद सभागृहात आज या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रकल्प अधिकारी निरज एस. मोरे, नगरसेविका गीता सिडाम, आशा उईके यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

आमदार श्री. भोंडेकर म्हणाले, आदिवासी विभागामार्फत ही चांगली योजना राबविण्यात येत आहे. खावटी अनुदान योजनेच्या माध्यामातून शासनातर्फे होणारी मदत गोर गरीब लाभार्थ्यांना मोलाची ठरणार आहे. खावटी अनुदान योजनेव्यतिरिक्त आदिवासी विभागाच्या अनेक योजना आहेत त्या योजनांचा सुध्दा आपण लाभ घ्यावा. गरजू लाभार्थ्यांना घरकुल योजनेचा लाभ द्या, असे त्यांनी सांगितले.

प्रास्ताविकेतून श्री. मोरे म्हणाले, कोरोना महामारीच्या काळात लॉकडाऊन लागल्यामुळे गोर गरीब नागरिकांचा रोजगार बुडाला. त्यामुळे अनुसूचित जमातीच्या नागरिकांकरिता खावटी अनुदान योजना शासनातर्फे सुरू करण्यात आली. या योजनेमध्ये भंडारा जिल्ह्यात एकूण 10 हजार 384 लाभार्थी पात्र ठरले. खावटी अनुदान योजनेसाठी अद्यापही अर्ज भरणे सुरू असून गरीब व गरजू लाभार्थ्यांनी अर्ज करावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

कार्यक्रमाचे संचालन मुख्याध्यापक कमलेश सार्वे यांनी केले व उपस्थितांचे आभार सहाय्यक प्रकल्प अधिकारी निर्मल झाडे यांनी मानले.