भंडारा : जिल्हाधिकारी पोहोचले थेट शेतकऱ्याच्या बांधावर शेती व्यवसायाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड द्या  – जिल्हाधिकारी संदीप कदम

जिल्हाधिकारी पोहोचले थेट शेतकऱ्याच्या बांधावर शेती व्यवसायाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड द्या – जिल्हाधिकारी संदीप कदम

  • यांत्रिक धान लागवड पाहणी

भंडारा, दि.18:- दिवसेंदिवस धानाची शेती परवडत नसल्याने शेतकऱ्यांनी भाजीपाला, फुलशेती, फळबागेची लागवड करावी, शाश्वत शेती करून शेती व्यवसायाला व्यापारी दृष्टिकोनातून बघणे गरजेचे आहे, यासाठी शेतकऱ्यांनी फक्त यांत्रिकीकरनाचा वापरच नव्हे तर तांत्रिक तज्ञ लोकांच्या सल्ल्यानुसारच आधुनिक शेती करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी केले.

            भंडारा तालुका कृषी विभाग व तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्माच्या) वतीने भंडारा तालुक्यातील जाख येथे गणेशपूर शेतकरी उत्पादक कंपनीचे अध्यक्ष संजय एकापूरे यांच्या प्रक्षेत्रावर यांत्रिक पद्धतीने धान लागवडीच्या प्रात्यक्षिकावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत जिल्हा कृषी अधीक्षक हिंदुराव चव्हाण, उपविभागीय कृषी अधिकारी शांतीलाल गायधने, भंडारा तालुका कृषी अधिकारी अविनाश कोटांगले, जाखचे कृषी सहाय्यक आनंद मोहतुरे, भंडारा तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक सतीश वैरागडे, संजय एकापूरे, देवानंद चौधरी, जाखचे सरपंच निलेश गाढवे, उपसरपंच विनोद जगनाडे, अंकित एकापूरे, डॉ. नारायण झंझाड, सतीश ठवकर, कैलाश सेलोकर, तलाठी हलमारे, प्रथमेश आर्य, प्रमोद जगनाडे व शेतकरी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी कदम यांनी आत्मा अंतर्गत गणेशपूर शेतकरी उत्पादक कंपनीला शेतकऱ्यांसाठी धान्य स्वच्छता व प्रतवारी गृह ( ग्रेडिंग) तसेच शेतकऱ्यांसाठी उभारलेल्या कृषी केंद्राची पाहणी केली. जिल्हाधिकाऱ्यांनी कृषी विभाग व आत्मा यंत्रणेने शेतकऱ्यांसाठी घेतलेल्या पुढाकाराचे यावेळी कौतुक केले. कदम यांनी नाशिक, हिमाचल प्रदेशातील शेतकऱ्यांनी शेती व्यवसायात केलेली आर्थिक प्रगती ही उल्लेखनीय असून त्याप्रमाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी शेतकरी कंपन्यांमार्फत एकत्र येऊन बाजारपेठ मिळवावी तसेच शेतमाल विक्रीसाठी दलालांची मध्यस्थी टाळून एकत्र येण्याचे आवाहन केले. यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे शेतकऱ्यांना सर्वतोपरी सहकार्याचे आश्वासन दिले. भंडारा तालुका कृषी अधिकारी अविनाश कोटांगले यांनी यांत्रिक पद्धतीने भात लागवडीसाठी तयार झालेल्या मॅट नर्सरी तसेच ढेंच्या (सोनबोरू) या हिरवळीच्या खताबाबत व शेतकरी उत्पादक कंपनीच्या कामकाजाबाबत माहिती दिली. जिल्हा कृषी अधीक्षक हिंदुराव चव्हाण यांनी शेतकऱ्यांना फळबाग लागवड करुन प्रधानमंत्री सूक्ष्म सिंचन योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे. तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक सतीश वैरागडे यांनी आत्माअंतर्गत शेतकऱ्यांसाठी प्रतवारीगृह (ग्रेडिंग) उभारल्याने आज शेतकऱ्यांच्या शेतमालाला चांगला भाव मिळत असल्याचे सांगितले. जाखचे कृषी सहाय्यक आनंद मोहतुरे यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या विकासासाठी गणेशपूर शेतकरी उत्पादक कंपनीच्या उपक्रमांची माहिती दिली. संचालन आत्माचे सतीश वैरागडे यांनी केले तर आभार कृषी सहाय्यक आनंद मोहतुरे यांनी मानले.

आधुनिक शेतीसाठी नाशिक जिल्ह्याचा आदर्श

 भंडारा जिल्ह्याचे धान हे प्रमुख पीक असले तरी या पिकातून शेतकऱ्यांची मोठी आर्थिक उलाढाल होत नाही. कोरोनानंतर आता जग बदलले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनीही शेती हा व्यवसाय म्हणून करणे गरजेचे असून यासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी शेतकरी उत्पादक कंपनीमार्फत एकत्र येत भाजीपाला, फळशेतीची कास धरावी. यासाठी नाशिक जिल्ह्यातील सह्याद्री फार्म हाऊस तसेच नाशिक जिल्ह्यातील अन्य शेतकऱ्यांच्या शेतावर भेटी देत शेती व्यवसायात केलेली प्रगतीचा पाहून शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या, तज्ञांच्या मार्गदर्शनात कमीत कमी क्षेत्रात अधिक उत्पादन घेत स्वतःची आर्थिक उन्नती साधावी असे आवाहन कदम यांनी केले.