गडचिरोली : ग्रामीण भागाच्या विकासात जिल्हा बॅंकेचा महत्वाचा वाटा -जिल्हाधिकारी यांचे प्रतिपादन

ग्रामीण भागाच्या विकासात जिल्हा बॅंकेचा महत्वाचा वाटा -जिल्हाधिकारी यांचे प्रतिपादन

जिल्हा बॅंकेत आर्थिक व डिजिटल साक्षरता उपक्रम

सदाशिव माकडे (प्रतिनिधी)
(गडचिरोली जिल्हा)

गडचिराेली, दि.१४ : ग्रामीण भागातील सामान्य नागरिक, महिला, शेतकरी यांना कर्जाचा पुरवठा करण्याबराेबरच त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचे महत्वाचे काम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेने केले आहे. माेठ्या गावांमध्ये शाखांचा विस्तार केल्याने ग्रामीण भागातील नागरिकांना या बॅंकेबाबत आपुलकीची भावना निर्माण झाली आहे. सर्व शासकीय याेजनांचे पैसे थेट बॅंक खात्यात जमा केले जात असल्याने ग्रामीण भागात बँकेचे जास्त खातेदार आहेत असे प्रतिपादन जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी केले.
नाबार्डच्या ४० व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या सभागृहात बुधवारी आर्थिक व डिजिटल साक्षरता कार्यक्रमाचे आयाेजन करण्यात आले. याप्रसंगी जिल्हाधिकारी मार्गदर्शन करीत हाेते. कार्यक्रमाला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष प्रंचित पाेरेड्डीवार, मुख्य वनसंरक्षक डाॅ. किशाेर मानकर, नाबार्डचे जिल्हा व्यवस्थापक राजेंद्र चाैधरी, जिल्हा दुग्ध विकास अधिकारी यादव, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश आयलवार, कृषी विज्ञान केंद्राचे जिल्हा समन्वयक डाॅ. संदीप कऱ्हाळे, मत्स्य व्यवसाय विभागाचे सहायक आयुक्त प्रशांत वैद्य आदी मान्यवर उपस्थित हाेते.
यावेळी मार्गदर्शन करताना प्रंचित पाेरेड्डीवार म्हणाले, नाबार्डच्या माध्यमातून ग्रामीण भागाच्या विकासासाठी विविध याेजना राबविल्या जातात. देशाच्या विकासात सहकार क्षेत्राचे महत्व ओळखून केंद्र शासनाने स्वतंत्र मंत्रालयाची स्थापना केली आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचा मुख्य उद्देश ग्रामीण भागाचा विकास करणे आहे. त्यादृष्टीनेच जिल्हा बॅंकेचे नियाेजन केले जात आहे. त्याचा सकारात्मक परिणाम दिसून येत आहे, असे मार्गदर्शन पाेरेड्डीवार यांनी केले.
नाबार्डचे जिल्हा व्यवस्थापक राजेंद्र चाैधरी यांनी देशातील चांगल्या बॅंकांमध्ये नाबार्डचा समावेश आहे. ग्रामीण भागातील रस्ते, पूल तसेच सिंचनाचे प्रकल्प ग्रामीण भागाच्या विकासाला दिशा देण्याचे काम नाबार्डने केले आहे, असे मार्गदर्शन केले.
प्रास्ताविक बॅंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश आयलवार, संचालन व्यवस्थापक राजू साेरते तर आभार नाबार्डचे जिल्हा व्यवस्थापक राजेंद्र चाैधरी यांनी मानले.

बचत गटांना कर्जाचे वितरण
-कार्यक्रमाप्रसंगी स्वयंराेजगार करू इच्छिणाऱ्या अडपल्ली, गडचिराेली येथील बचत गटांना कर्जाचे वितरण करण्यात आले. ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतले आहे अशा शेतकऱ्यांना केसीसी कार्डचे वितरण करण्यात आले. तसेच परिवर्तन प्रभातसंघ पाेर्ला या बचत गटाला बॅंकेमार्फत भेटवस्तू देण्यात आली.

-जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते बॅंकेच्या आवारात वृक्षाराेपण करण्यात आले.
-जिल्हा बॅंकेमार्फत ग्रामीण भागात आर्थिक व डिजिटल साक्षरतेविषयी विविध उपक्रम राबविले जातात. आर्थिक व डिजिटल साक्षतेसाठी बॅंकेत स्वतंत्र कक्ष तयार करण्यात आले आहे. या कक्षाला जिल्हाधिकारी यांनी भेट दिली. बॅंकेमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध याेजना, बॅंकेची आर्थिक स्थिती याबाबतची माहिती बॅंकेचे सीईओ सतीश आयलवार यांच्याकडून जाणून घेतली.