गडचिरोली जिल्ह्यातील नैसर्गिक आपत्तीचा विचार करता पीक विमा घेणे आवश्यक – जिल्हाधिकारी दीपक सिंगला

जिल्ह्यातील नैसर्गिक आपत्तीचा विचार करता पीक विमा घेणे आवश्यक – जिल्हाधिकारी दीपक सिंगला

बिगर कर्जदार शेतकऱ्यांना आपले सेवा सरकार केंद्रात पीक विमा घेता येणार

गडचिरोली, दि.09, जिमाका* : प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत विमा घेण्याची अंतिम तारीख 15 जुलै असून जिल्हयातील शेतकऱ्यांनी विविध नैसर्गिक आपत्तींचा विचार करता पीक विमा घेणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकारी दीपक सिंगला सांगितले. जिल्हास्तरीय पीक विमा बाबत आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी कर्जदार शेतकरी यांचा वीमा बँकेमार्फत शेतकऱ्यांची संमती घेवून काढला जात असतो. मात्र इतर बिगर कर्जदार शेतकऱ्यांनाही पीक विमा घेण्यासाठी आवश्यक पीक विमा रक्कम भरून कोणत्याही आपले सेवा सरकार केंद्रावर पीक विमा काढता येणार आहे. याबात जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी बैठकीत सूचना केल्या. तसेच उर्वरीत कालावधीत गरजू शेतकऱ्यांना पीक विमा काढण्यासाठी प्रशासन तसेच बँकांनी विशेष सेवा उपलब्ध करून द्याव्यात अशा सूचना त्यांनी केल्या. या बैठकीला जिल्हा कृषी अधीक्षक भाऊसाहेब बऱ्हाटे, नाबार्डचे जिल्हा व्यवस्थापक राजेंद्र चौधरी, एलडीएम युवराज टेंभुर्णे व इतर बँकांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

शेतकऱ्यांना विमा हा प्राथमिक कृषी सहकारी सोसायटी, जिल्हा मध्यवर्ती बँक, क्षेत्रीय ग्रामीण बँक, व्यावसायिक बँक, आपले सेवा सरकार केंद्र येथे जावून तसेच भारत सरकारच्या www.pmfby.gov.in या संकेतस्थळावरती घेता येणार आहे. विमा संरक्षण घेतलेल्या शेतकऱ्यांनी नैसर्गिक आपत्ती मुळे बाधित पीक व बाधित क्षेत्राबाबत पीक विमा घेतल्यानंतर घटना घडल्यापासून 72 तासाच्या आत इफ्को टोकीओ जनरल इन्सूरन्श कंपनीच्या टोल फ्री 18001035490 या क्रमांकावर माहिती देणे आवश्यक असणार आहे.

जिल्ह्यातील आपले सेवा सरकार केंद्राच्या कामकाजाच्या वेळेत वाढ – पीक विमा अंतिम मुदत 15 जुलै असल्या कारणाने जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी सीएससीच्या कामकाजाच्या वेळेत सकाळी ७.०० ते सायंकाळी ७.०० वा. पर्यंत अशी वाढ करण्याच्या सूचना आजच्या बैठकीत दिल्या. याबाबत लेखी आदेशही तात्काळ देण्याच्या सूचना केल्या. सर्व आपले सेवा सरकार केंद्रांमध्ये शेतकऱ्यांना पीक विमा काढण्यासाठी शासनाने ठरवून दिलेली रक्कमच घ्यावी अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. ठरवून दिलेल्या रकमे पेक्षा कोणतीही सीएससी जादा दर आकारत असेल तर त्या केंद्रावर कारवाई करून ते बंद करण्यात यावे असे आदेश त्यांनी या बैठकीत दिले.

तालुका प्रशासनालाही दिल्या सूचना : पीक विम्याची इच्छुक शेतकऱ्यांना असलेली गरज लक्षात घेवून व उर्वरीत कालावधी पाहता जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी तालुकास्तरावरील तहसिलदार, कृषी कार्यालय, तलाठी, कृषीमित्र यांना सूचना दिल्या आहेत. विविध गावांमध्ये शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी दूर करून दिलेल्या मुदतीत इच्छुक शेतकऱ्यांचे पीक विमा काढण्याच्या सूचना यावेळी जिल्हाधिकारी यांनी दिल्या.