श्री गणेश आरोग्य अभियानांतर्गत 896 नागरिकांची आरोग्य तपासणी

श्री गणेश आरोग्य अभियानांतर्गत 896 नागरिकांची आरोग्य तपासणी

चंद्रपूर 10 सप्टेंबर – गणेशोत्सवाच्या मंगलमय वातावरणात नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्या पुढाकाराने राबविण्यात आलेल्या ‘श्रीगणेशा आरोग्याचा’ या विशेष मोहिमेअंतर्गत 896 नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी चंद्रपूर महानगरपालिका आरोग्य विभागातर्फे करण्यात आली.

28 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर दरम्यान राबविण्यात आलेल्या या विशेष मोहिमेत मनपाच्या 7 प्राथमिक आरोग्य केंद्रांद्वारे 7 आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते.या शिबिरांतून 307 पुरुष व 470 महिला तसेच 119 लहान बालके अश्या 896 नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली.तपासणीदरम्यान कुठल्याही नागरिकाला आजार आढळला नाही.

या शिबिरांत न्यू बाल गणेश मंडळ,हनुमान नगर गणेश मंडळ,याहू गणेश मंडळ,बाल बलवंत गणेश मंडळ,आदर्श विद्यार्थी गणेश मंडळ,एकता गणेश मंडळ,नूतन युवक गणेश मंडळ ही गणेश मंडळे सहभागी झाली होती. शिबिरांच्या यशस्वीतेसाठी वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नयना उत्तरवार,डॉ. अश्विनी भारत,डॉ.आरवा लाहिरी,डॉ.योगेश्वरी गाडगे,डॉ.शरयु गावंडे,डॉ.नेहा वैद्य,डॉ. जयश्री मालुसरे, डॉ अल्फीया खान यांचा सहभाग लाभला.