जनआरोग्य योजनेत सामान्य रुग्णालयाची उत्कृष्ट कामगिरी

जनआरोग्य योजनेत सामान्य रुग्णालयाची उत्कृष्ट कामगिरी

भंडारा,दि.18:- एकत्रित महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजना व प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेमध्ये उल्लेखनिय कामगिरी केल्याबद्दल जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आर.एस. फारुकी यांचा पालकमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. उपरोक्त दोन्ही योजनेमध्ये सन 2018 ते 2021 या कालावधीत जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा सर्वोत्कृष्ट रुग्णालय ठरले. रुग्णालयाच्या वतीने डॉ.आर.एस.फारुकी यांनी पुरस्कार स्विकारला.

जिल्हाधिकारी संदीप कदम, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय मुन, जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत जाधव यावेळी उपस्थित होते. जनआरोग्य योजनेत नाकाडे नर्सिंग होम भंडारा व उपजिल्हा रुग्णालय भंडारा यांनी सुध्दा उत्कृष्ट कामगिरी केली आहे. यांना सुध्दा पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. हा कार्यक्रम 15 ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात संपन्न झाला.

उत्कृष्ट संवाद कौशल्य असलेले व गणराज्य दिन असो वा स्वातंत्र्य दिन नियमितपणे धावते समालोचन करणारे जिल्हा परिषद वरठी येथील सहाय्यक शिक्षक मुकुंद ठवकर व लाल बहादूर शास्त्री विद्यालय भंडारा येथील सहाय्यक शिक्षीका श्रीमती स्मिता गालफाडे यांचा या कार्यक्रमात पालकमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांच्या हस्ते विशेष गौरव करण्यात आला.

भंडारा वन विभागाअंतर्गत वन्यजीव संरक्षण व बचाव कार्यामध्ये उल्लेखनिय कामगिरी केल्याबद्दल वनरक्षक निलेश श्रीरामे व वाहन चालक अनिल शेळके यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.