” भव्य राज्यस्तरीय भिंतीचित्र महोत्सव ” महाराष्ट्र राज्यातील हौशी व व्यावसायिक चित्रकार कला सादर करण्यास उत्सुक  

४०० हुन अधिक कलाकारांची कला पाहण्याची चंद्रपूरकरांना संधी

” भव्य राज्यस्तरीय भिंतीचित्र महोत्सव “

महाराष्ट्र राज्यातील हौशी व व्यावसायिक चित्रकार कला सादर करण्यास उत्सुक  

 

चंद्रपूर २० डिसेंबर – चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे आयोजीत राज्यस्तरीय भिंतीचित्र महोत्सवास राज्यातील ४०० हुन अधिक हौशी व व्यावसायिक चित्रकारांनी प्रतिसाद दर्शविला असुन २३ डिसेंबर ते २६ डिसेंबर दरम्यान चंद्रपूर शहरात त्यांच्या कलेचे प्रदर्शन पाहण्याची संधी सर्वांना मिळणार आहे. चंद्रपूर शहर सुशोभीकरण व सौंदर्यीकरण या मध्यवर्ती संकल्पनेवर आधारित भिंतीचित्र पेंटींग,वृक्ष पेंटींग, क्रीएटीव्ह पेंटींग या ३ स्पर्धा यात घेण्यात येणार असुन २१ डिसेंबर स्पर्धेत भाग घेण्याची अंतिम तारीख आहे .

मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद,नाशिक,अहमदनगर,अमरावती इत्यादी विविध शहरातील स्पर्धकांनी स्पर्धेत नाव नोंदविले आहे. भाग घेण्यास मनपातर्फे गुगल लिंक देण्यात आली असुन या लिंकवर तसेच प्रत्यक्ष स्वरूपातही मोठ्या प्रमाणात प्रतिसाद लाभत आहे. भाग घेणाऱ्या स्पर्धकांची जेवण,राहण्याची व्यवस्था मनपातर्फे करण्यात येणार असुन रंगरंगोटीसाठी आवश्यक त्या वस्तूंचा पुरवठा मर्यादीत स्वरूपात मनपातर्फे करण्यात येणार आहे.

सदर स्पर्धा ही शहर स्वच्छता व सौंदर्यीकरण अभियान, स्वच्छ सर्वेक्षण 2023 आणि माझी वसुंधरा अभियान अंतर्गत घेण्यात येत असुन विचारप्रवर्तक आणि नाविन्यपुर्ण अशी भिंतीचित्रे तयार करु शकणाऱ्या चित्रकार आणि कलाप्रेमींसाठी ही स्पर्धा आहे. शहरातील मुख्य दर्शनी भागातील भिंतींवर स्वातंत्र्य संग्रामातील शिलेदार, पर्यावरण संरक्षण, स्वच्छतापर संदेश, प्लास्टीक बंदी चंद्रपूरचे ऐतिहासिक वैभव, रेन वॉटर हार्वेस्टींग अशा विविध १४ विषयाचे चित्रण केले जाणार आहे.

भिंतीचित्र पेंटींग स्पर्धेत चित्रकारांसाठी वैयक्तीक गट व समुह गट ठेवण्यात आला आहे. समुह गटात प्रथम बक्षीस १ लक्ष ५१ हजार रुपये असुन द्वितीय १ लक्ष तर तृतीय बक्षीस ५१ हजार रुपये दिले जाणार आहे. तर वैयक्तीक गटातील स्पर्धकास एका ठिकाणी ( किमान 100 स्क्वे.फुट ) ची पेंटिंग करावी लागेल तसेच वैयक्तिक स्पर्धक एकापेक्षा जास्त ठिकाणी भित्तिचित्र काढू शकतात (जास्तीत जास्त 5 ठिकाणी ). या गटात प्रथम बक्षीस ७१ हजार रुपये असुन द्वितीय ५१ हजार तृतीय बक्षीस ३१ हजार रुपये तसेच प्रत्येकी १० प्रोत्साहनपर बक्षिसे सुद्धा दिली जाणार आहेत.

त्याचप्रमाणे वृक्ष पेंटींग स्पर्धेत नेमून दिलेल्या झाडांचे सौंदर्यीकरण करणे अपेक्षित आहे. यात अनुक्रमे २१ हजार,१५ हजार, ११ हजार रुपयांची बक्षिसे दिली जाणार आहेत. क्रीएटीव्ह पेंटींग स्पर्धेत सार्वजनिक ठिकाणी सभोवताली उपलब्ध असलेल्या वस्तु / झाडी इत्यादींचा वापर करून कलात्मक पेंटींग करणे अपेक्षित आहे.यात सुद्धा अनुक्रमे २१ हजार,१५ हजार, ११ हजार रुपयांची बक्षिसे दिली जाणार आहेत.