गडचिरोली जिल्हा पिक कापणी प्रयोगाचे प्रशिक्षण संपन्न

गडचिरोली जिल्हा पिक कापणी प्रयोगाचे प्रशिक्षण संपन्न

 

गडचिरोली,दि.02: महाराष्ट्र शासन कृषि विभागाच्या निर्देशानुसार प्रधानमंत्री पिक विमा योजनेच्या अनुषंगाने करावयाचे जिल्हास्तरीय पिक कापणी प्रयोगाचे प्रशिक्षण जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी बसवराज मास्तोळी यांचे उपस्थितीत दिनांक १ व २ डिसेंबर २०२२ रोजी पार पडले. याप्रसंगी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, बसवराज मास्तोळी यांनी जिल्ह्यातील शेत पिकाचे विविध नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्यास प्रधानमंत्री पिक विमा योजनेंतर्गत नुकसान भरपाई निश्चित करण्यासाठी, पैसेवारी निश्चित करण्यासाठी पिक कापणी प्रयोग अन्वये प्राप्त होणारी सरासरी उत्पन्नाच्या माहितीचा वापर होतो तसेच त्याकरिता पिक कापणी प्रयोग महसूल /जि.प./ कृषि विभाग यांनी अचूकपणे करणेबाबत सूचना उपस्थित प्रशिक्षणार्थींना दिनांक १ डिसेंबर २०२२ रोजी शेतकरी प्रशिक्षण गृह, सोनापूर कृषि चिकीत्सालय रोपवाटिका येथे आयोजीत कार्यक्रमाच्या प्रसंगी दिल्या. या प्रसंगी कु. शितल खोबरागडे, तंत्र अधिकारी,(सांख्यिकी) जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालय गडचिरोली, तसेच महसूल विभाग, जिल्हा परीषद व कृषि विभागातील अधिकारी, कर्मचारी व विमा कंपनी प्रतिनिधी उपस्थित होते. दिनांक १ डिसेंबर २०२२ रोजी महसूल विभाग, जिल्हा परीषद व कृषि विभागातील अधिकारी व कर्मचारी यांच्या उपस्थितीत जिल्हयाचे रब्बी हंगाम सन २०२२ च्या पिक कापणी प्रयोगाचे नियोजन करण्यात आले.

दिनांक २ डिसेंबर २०२२ रोजी प्रशिक्षणाच्या दुसऱ्या दिवशी शासनाच्या मार्गदर्शक सुचनेप्रमाणे जिल्हयातील पिक कापणी प्रयोगाचे तांत्रिक प्रशिक्षण विजय पत्रे कृषि पर्यवेक्षक (सांखिकी) यांनी दिले तर पिक कापणी प्रयोगाचे CCE App चे प्रशिक्षण कु. शितल खोबरागडे, तंत्र अधिकारी,(सांख्यिकी) जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालय गडचिरोली यांनी ऑनलाईन स्वरुपात दिले.

पिक कापणी प्रयोग अन्वये प्राप्त होणारी सरासरी उत्पन्नाची आकडेवारी अचूक व विहित वेळेत प्राप्त होईल या दृष्टीने कार्यवाही करण्याच्या सूचना उपस्थित सर्व क्षेत्रीय अधिकारी व कर्मचारी यांना दिल्या. त्याचबरोबर पिक कापणी प्रयोगाच्या गावस्तरीय समितीचे प्रशिक्षण तालुका स्तरावर आयोजित करण्यात यावे व गावस्तरीय समिती सदस्यास प्रायोगिक पिकाच्या कापणीवेळी उपस्थित राहण्याबाबत क्षेत्रीय कर्मचारी यांनी कळविण्याच्या सूचना दिल्या. तसेच महसुल विभाग, जिल्हा परिषद व कृषि विभाग या तिन्ही यंत्रणेच्या क्षेत्रीय कर्मचाऱ्यांनी समन्वय साधून पिक कापणी प्रयोग पूर्ण करावेत अशा सुचना देण्यात आल्या.

कु. शितल खोबरागडे, तंत्र अधिकारी,(सांख्यिकी) यांनी उपस्थित मान्यवर व सर्व प्रशिक्षणार्थी यांचे आभार मानून प्रशिक्षण संपल्याचे जाहीर केले.