जिल्ह्यातील नागरिकांना कीटकजन्य आजारापासून स्वतःचे संरक्षण करण्याचे आवाहन Ø कीटकजन्य आजाराचा उद्रेक टाळण्यासाठी गप्पी मासे महत्वाचे

जिल्ह्यातील नागरिकांना कीटकजन्य आजारापासून स्वतःचे संरक्षण करण्याचे आवाहन

Ø कीटकजन्य आजाराचा उद्रेक टाळण्यासाठी गप्पी मासे महत्वाचे

चंद्रपूर, दि. 10 जुलै : जिल्हा परिषद कार्यालय परिसरात असलेल्या कारंज्यामध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मिताली सेठी यांच्या हस्ते गप्पी मासे सोडण्यात आले. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. प्रतीक बोरकर, तसेच हत्तीरोग नियंत्रण पथक व जिल्हा हिवताप कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते. याप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मिताली सेठी यांनी जिल्ह्यातील नागरिकांना कीटकजन्य आजारापासून स्वतःचे संरक्षण करण्याचे आवाहन केले.

प्राथमिक आरोग्य केंद्र, नागरी आरोग्य केंद्र तसेच हत्तीरोग कार्यालय, चंद्रपूर यांच्याकडे संपर्क साधून गप्पी मासे प्राप्त करून घेण्याचे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत यांनी केले. तसेच गप्पी माशांची मादी ही नरापेक्षा आकाराने मोठी असते. गप्पी माशांची मादी एका महिन्याच्या अंतराने पिल्ले देत असते. एक मादी एका वेळेस 250 ते 300 पिल्ले देत असून या पिल्लांची दोन महिन्यातच वाढ होऊन विकसित मासे होतात. गप्पी माशांबाबत माहिती, मार्गदर्शन तथा गप्पी माशांचे फायदे त्यांनी विशद केले.

जैविक उपायोजना नियंत्रणाकरीता अळीभक्षक गप्पी माशांचा वापर करण्यात येतो. साचलेल्या पाण्यात गप्पी मासे सोडल्यास ते डासांच्या अळ्यांचे भक्षण करून डासाची घनता कमी करण्यास मदत करतात. गप्पी मासे सर्व प्रकारच्या डास अळ्यांचे भक्षण करतात त्यामुळे हिवताप व हत्तीरोग निर्मूलन कार्यक्रमांमध्ये मदत म्हणून ही योजना राबविल्या जाते.

कीटकजन्य आजाराच्या निर्मूलनाकरीता नागरिकांनी घ्यावयाची काळजी:-

घराभोवती पावसाचे पाणी साचू देऊ नये, परिसरातील डबकी बुजवावी किंवा वाहती करावी शक्य नसल्यास गप्पी मासे सोडावे. इमारतीवरील व घरातील पाण्याचे टाके झाकून ठेवावे. झोपतांना मच्छरदाणीचा वापर करावा. सेप्टिक टॅंकच्या पाईपला जाळ्या बसवाव्यात. आठवड्यातून एकदा कोरडा दिवस पाळावा. कुलर मधील पाणी आठवड्यातून एकदा रिकामे करावे.

याबाबत जिल्हा हिवताप अधिकारी व हत्तीरोग अधिकारी डॉ. प्रतीक बोरकर त्यांनी जिल्ह्यातील नागरिकांना जैविक उपाययोजना राबविण्याचे आवाहन केले.