जिल्हा युवा मंडळ पुरस्काराकरिता अर्ज आमंत्रित

जिल्हा युवा मंडळ पुरस्काराकरिता अर्ज आमंत्रित

 

भंडारा, दि. 29 : ग्रामीण युवक मंडळांना प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने भारत सरकारच्या युवा कार्यक्रम खेळ मंत्रालयाअंतर्गत नेहरू युवा केंद्राच्या माध्यमातून जिल्हा युवा मंडळ पुरस्कार योजना सुरू करण्यात आली आहे. राष्ट्रबांधणीच्या कार्यात महत्वपूर्ण योगदान देण्याकरिता युवा मंडळांनी पुढे यावे हा योजनेचा मुख्य उद्देश आहे. नेहरू युवा केंद्र यांच्याशी संलग्नित युवा वर्गाकरिता काम करणाऱ्या व संस्था नोंदणी अंतर्गत पंजीकृत युवा मंडळे यांनी 12 डिसेंबर 2022 पर्यंत जिल्हा युवा मंडळ पुरस्काराकरिता अर्ज सादर करावे, असे जिल्हा युवा अधिकारी हितेंद्र वैद्य यांनी कळविले आहे.

 

आरोग्य, कुटुंब कल्याण, पर्यावरण संरक्षण, साक्षरता, महिला सक्षमीकरण, क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम, व्यवसाय प्रशिक्षण व रोजगार निर्मिती, सामाजिक समस्या व स्थानिक प्रश्नांचे निराकरण व ग्राम स्वच्छता इत्यादी क्षेत्रातील योगदानाच्या आधारे जिल्हा निवड समिती जिल्हा स्तरावरील जिल्हा उत्कृष्ट युवा मंडळ पुरस्काराकरिता 1 एप्रिल 2021 ते 31 मार्च 2022 या कालावधीतील केलेले कार्य ग्राह्य धरून युवा मंडळाची निवड करेल. मागील दोन वर्षात ज्यांना हा पुरस्कार प्राप्त झाला आहे ते या पुरस्काराकरिता पात्र ठरणार नाही . पुरस्काराचे स्वरूप 25 हजार रूपये व प्रमाणपत्र असे राहील.

 

प्रस्तावामध्ये युवा मंडळाचे नाव, पत्ता, अध्यक्षाचे व सचिवाचे नाव व पत्ता, युवा निवडणूक शेवटी झाल्याची तारीख वर्ष, मंडळाचे पदाधिकारी मंडळाचे सदस्य स्त्री व पुरुष संख्या, मंडळाचा संक्षिप्त इतिहास, आजपर्यंत घेण्यात आलेल्या कार्यक्रमाचा सारांश, नोंदणीची तारीख व क्रमांक, सन 2021-22 या आर्थिक वर्षात घेण्यात आलेले कार्यक्रम, उपक्रम अहवाल, मंडळाला मिळालेले पुरस्कार, प्रमाणपत्रे, छायाचित्रे, वर्तमानपत्राची कात्रणे, अभिनंदन पत्रे, सन 2021-22 या आर्थिक वर्षाचे उत्पन्न व खर्चाचे विवरण ऑडिटसह मंडळाच्या उपलब्धी संबंधी अहवाल 1 हजार शब्दासह दिनांक 12 डिसेंबर 2022 पर्यंत नेहरू युवा केंद्र येथे अर्ज सादर करावे.