सार्वभौम, धर्मनिरपेक्ष भारत घडविण्यासाठी तरुणांनी पुढाकार घ्यावा

सार्वभौम, धर्मनिरपेक्ष भारत घडविण्यासाठी तरुणांनी पुढाकार घ्यावा

अभ्यासूवृत्ती इतकी जोपासा की पैशाची ताकत कमी होईल .

लोकशाही व्यवस्थेत विरोधी पक्षाची भूमिका सत्ताधारी पक्षा इतकी महत्वाची.

लोकशाहीचं सौंदर्य जोपासण्याची आवश्यकता.

*लोकशाहीला घातक असलेल्या वाघांचा बंदोबस्त करा तरच लोकशाही टिकेल*

*स्वातंत्र्याला जपणं प्रत्येकाचं कर्तव्य*

*- विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार*

नागपूर, दि.१५ : जात, धर्म, पंथ, प्रांत, भाषा, लिंग आणि रंग असा कोणताही भेद न पाळता सार्वभौम, धर्मनिरपेक्ष भारत घडविण्यासाठी तरुणांनी पुढाकार घ्यावा. यासाठी स्वतःला झोकून देऊन काम करावे, असे आवाहन करत स्वातंत्र्याला गुलाम बनवण्यासाठी दिवसागणिक अनेक शक्ती, लोक नव नवे षडयंत्र रचत असतात त्या षडयंत्रांना हाणून पाडून स्वातंत्र्याला जपणं हे प्रत्येकाचे कर्तव्य असल्याचे प्रतिपादन विधान सभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केले.

राष्ट्रकुल संसदीय अभ्यास वर्गात ‘संसदीय लोकशाहीत सत्तारूढ आणि विरोधी पक्षांचे स्थान, कर्तव्ये आणि विधी मंडळातील भूमिका’ या विषयावर अभ्यास वर्गात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत हाते. यावेळी आमदार प्रविण दरेकर, विधानमंडळ सचिव विलास आठवले उपस्थित होते.

वडेट्टीवार म्हणाले, विरोधकांनी संविधानाची पायमल्ली करणाऱ्या सत्ताधाऱ्यांना धरून लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी सरकारला भाग पाडणे हे आम्हा विरोधकांचे काम आहे. डाॅ.बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, विरोधी पक्ष नसल्यावर लोकांचे मूलभूत हक्क धोक्यात येतात. कारण या हक्कांची पायमल्ली करणाऱ्या सत्तारूढ पक्षाला कोणीच जाब विचारू शकत नाही. ज्या देशात संसदीय लोकशाही नांदते त्या देशात विरोधी पक्ष ही सरकारमान्य राजकीय संस्था असते. संविधानात मोठी ताकद आहे. संविधानाने देशातल्या प्रत्येक नागरिकाला सामाजिक, आर्थिक आणि राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य दिले आहे. विविधतेने नटलेली ही आपली लोकशाही टिकवण्यात व सार्वभौम भारत घडवण्यात तरुणांचे योगदान महत्वाचे असल्याचे श्री. वडेट्टीवार यांनी सांगितले

ब्रिटनचे पंतप्रधान विस्टन चर्चिल म्हणाले होते, भारतात लोकशाही टिकणार नाही. तथापि आजही
आपल्या देशातील विविधतेने नटलेली लोकशाही लोकांनी जपली आहे. यापुढेही संविधानाचे रक्षण करणे हे सत्ताधारी आणि विरोधी पक्ष या दोघांची महत्वपूर्ण जबाबदारी असून यामध्ये नागरिकांचा सहभागही तितकाच महत्त्वाचे आहे असे श्री. वडेट्टीवार म्हणाले.

*मानवता वादी विचार करणारी माणसं भारतीय लोकशाहीचे सौंदर्य*
वडेट्टीवार म्हणाले, माननीय राजीव गांधी या देशाचे पंतप्रधान होते आणि अटल बिहारी वाजपेयी यांची प्रकृती खराब होती त्यांना किडनीचा आजार झाला होता डॉक्टरांनी त्यांना अमेरिकेत जाऊन शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला होता. अटल बिहारीजी व्यथित झाले की एवढा खर्च आणि प्रवास आणि दवाखाना याचा खर्च कसा उचलायचा. ही गोष्ट देशाचे तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांना समजली त्यांनी भारत सरकारच्या वतीने अमेरिकेत जाणाऱ्या एका शिष्ट मंडळात अटलजींच् नाव टाकलं आणि शासनाचा प्रतिनिधी म्हणून त्यांना बाहेर देशात पाठवून त्याच कालावधीत सरकारी खर्चाने त्यांच्यावर शस्त्रक्रिया घडवून आणली. हा मानवता वादी विचार करणारी लोक या देशात होते हे भारतीय लोकशाहीचे सौंदर्य असल्याचे श्री. वडेट्टीवार म्हणाले.

*लोकशाहीला घातक असलेल्या वाघांचा बंदोबस्त करा तरच लोकशाही टिकेल.*
वडेट्टीवार म्हणाले, सध्या नागपुरात आहात इथून जवळच मझ्या मतदार संघात ताडोबा व्याघ्र प्रकल्प आहे. तिथे सर्वाधिक वाघ आहेत तिथे जाऊन या.वाघ आपल्या क्षेत्रात कुणालाही प्रवेश करू देत नाही. देशात अलीकडे असे वाघ पहायला मिळतात, लोकशाही टिकवायची असेल तर लोकशाहीला घातक असलेल्या वाघांचा बंदोबस्त करण गरजेचं आहे.

*लोकशाही मार्गाने हक्क मिळत नसतील तर उद्रेक होतोच* .
संसद, विधीमंडळ ही लोकांचे प्रतिनिधित्व करणारी लोकशाहीची मंदिरे आहेत. राष्ट्रकुल संसदीय अभ्यास वर्गाच्या माध्यमातून संसदीय लोकशाहीचे मूल्य शिकवण्याचे काम होत आहे. राष्ट्रकुल संसदीय मंडळाने आपल्याला विचार मांडण्याची, विधिमंडळाचे कामकाज जाणून घेण्याची संधी दिली आहे. त्यामुळे या अभ्यास वर्गात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी अभ्यासूवृत्तीने सामाजिक, राजकीय कार्यात पुढे येऊन लोकांच्या प्रश्नांना न्याय मिळवून द्यावा. तरुण पिढीने समाज माध्यमांचा चांगल्या कामासाठी वापर करावा, असे आवाहनकरत श्री.वडेट्टीवार म्हणाले संसदेत घडलेल्या प्रकार चुकीचाच आहे. पण लोकशाही मार्गाने हक्क मिळत नसतील तर उद्रेक होतोच. परिस्थती गुन्हेगार बनवते. या परिस्थितीला कारणीभूत कोण याचाही विचार होणं गरजेचं आहे. तरुणांना लिहिणं, वाचणं, बोलण्याला बंधन दिसतात तेव्हा तरुणांची जबाबदारी मोठी आहे देश सर्वोच्च आहे असे श्री. वडेट्टीवार म्हणाले.

विधिमंडळाचे जनसंपर्क अधिकारी निलेश मदाने यांनी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा परिचय करून दिला. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचा विद्यार्थी वैभव सारवे याने आभार मानले.