कृषि विज्ञान केंद्र तर्फे “हरभरा पिकामधील बिजप्रक्रिया व लागवड तंत्रज्ञान शेतकरी प्रशिक्षण

कृषि विज्ञान केंद्र तर्फे “हरभरा पिकामधील बिजप्रक्रिया व लागवड तंत्रज्ञान शेतकरी प्रशिक्षण

कृषी विज्ञान केंद्र सिंदेवाही, जिल्हा चंद्रपूर तर्फे ‘राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान’ अटारी पुणे या योजनेअंतर्गत राबविण्यात येणारे रब्बी हंगाम कडधान्य पिकांमध्ये हरभरा या पिकाचे समुह प्रथम रेषिय प्रात्यक्षिके चंद्रपुर जिल्हयात ७५ शेतकरी लाभार्थ्यांच्या एकुण ३० हेक्टरवर प्रात्यक्षिके राबविण्यात येत आहे. याप्रसंगी एक दिवसीय शेतकरी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. व्हि.जी नागदेवते, वरीष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख, के. व्ही. के. सिंदेवाही, होते. मार्गदर्शनामध्ये डॉ.विजय एन.सिडाम, विषय विशेषज्ञ, कृषी विस्तार यांनी शेतक-याना प्रात्यक्षिकासाठी देण्यात आलेली डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथून प्रसारित झालेली हरभरा या पिकाची पिडीकेव्ही कांचन या वाणा विषयी तसेच हरभरा या कडधान्य पिकाचे आहारातील महत्व या विषयी माहीती दिली. प्रमुख मार्गदर्शनामध्ये डॉ. व्हि.जी नागदेवते यांनी हरभरा लागवड तंत्रज्ञान, खतांचे योग्य नियोजन आणि हरभरा पिकाच्या पेरणीच्या विविध पद्धती तसेच शेतक-यांना बिजप्रक्रियेचे महत्व सांगण्यात आले आणि हरभरा लागवड करण्याआधी पुढीलप्रमाणे बिजप्रक्रियेचा अवलंब करून आपल्या बियाणांचे जमिनीमधुन व बियाणाद्वारे पसरणा-या रोगांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी, उगवणक्षमता वाढविण्यासाठी आणि कमी खर्चात रोगप्रतिबंधात्मक पेरणीकरीता पुढीलप्रमाणे बिजप्रक्रियेच अवलंब नक्कीच करावा असे आवाहन करण्यात आले. बीजप्रक्रिया: बियाणांची उगवण चांगली होण्यासाठी आणि रोप अवस्थेत बुरशीजन्य रोगापासुन (मुळकुज व मररोग) संरक्षण करण्यासाठी पेरणीपुर्वी प्रति किलो बियाण्यास ५ ग्रॅम ट्रायकोडर्मा ही जैविक बुरशी चोळावे तसेच पी. एस. बी व रायझोबीयम जिवाणुसंवर्धनाचे २५० ग्रॅम संवर्धन गुळाच्या थंड द्रावणातुन १० किलो बियाणास चोळावे (गुळाचे द्रावण तयार करण्यासाठी १ लिटर पाण्यात १२५ ग्रॅम गुळ घेवुन ते विरघळेपर्यत पाणी कोमट करावे त्यानंतर बियाणे १ तासभर सावलीत सुकवुन लगेच पेरणी करावी ) यामुळे हरभ-याच्या मुळावरील ग्रंथीचे प्रमाण वाढुन हवेतील नत्र अधिक प्रमाणात शोषुन घेवुन पिकास उपलब्ध केला जातो आणि पिकाचे ५ ते १० टक्के उत्पादन वाढते. किंवा ट्रायकोडर्मा जैविक बुरशी ऐवजी २ ग्रॅम थायरम + २ ग्रॅम कार्बेन्डाझिम एकत्र करून प्रति किलो बियाणास चोळावे. सदर प्रशिक्षणामध्ये डॉ. वर्षा जगदाळे विषय विशेषज्ञ (पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र) उपस्थित होते.