राज्यस्तरीय रोजगार मेळाव्याचे गुरुवारी आयोजन निवड झालेल्या उमेदवारांना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते नियुक्तीपत्रे देणार

राज्यस्तरीय रोजगार मेळाव्याचे गुरुवारी आयोजन निवड झालेल्या उमेदवारांना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते नियुक्तीपत्रे देणार

मुंबई, दि. 02 : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राज्यात एका वर्षात ७५ हजार रोजगार देण्याचा महासंकल्प राज्य शासनाने केला आहे. त्याचे औचित्य साधून गुरुवार, दिनांक ३ नोव्हेंबर रोजी आयोजित राज्यस्तरीय रोजगार मेळावा निमित्ताने निवड झालेल्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात येणार आहेत. या मेळाव्यास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी दृकश्राव्य माध्यमाद्वारे त्यांचा संदेश देणार आहेत.

 

येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम होणार असून यावेळी विविध विभागाचे विविध पदांसाठी पात्र उमेदवारांना नियुक्तीपत्र प्रदान केली जाणार आहेत. याचवेळी विभागीय पातळीवरही अशाच प्रकारे रोजगार मेळावे आयोजित करण्यात आले असून तेथेही पात्र उमेदवारांना मंत्री महोदयांच्या हस्ते नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात येणार आहेत.

 

या कार्यक्रमासाठी विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, शालेय शिक्षण आणि मराठी भाषा मंत्री तथा मुंबई शहर पालकमंत्री दीपक केसरकर, पर्यटन आणि कौशल्य विकास व उद्योजकता, महिला आणि बालविकास मंत्री तथा मुंबई उपनगर पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, सार्वजनिक बांधकाम ( सार्वजनिक उपक्रम वगळून), अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा पालघर आणि सिंधुदुर्ग पालकमंत्री रवींद्र चव्हाण, राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा ठाणे जिल्हा पालकमंत्री शंभूराज देसाई, उद्योगमंत्री तथा रायगड व रत्नागिरी पालकमंत्री उदय सामंत आणि खासदार अरविंद सावंत यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती, सामान्य प्रशासन विभागाचे (सेवा) अपर मुख्य सचिव नितीन गद्रे यांनी दिली.

 

राज्यस्तरीय रोजगार मेळाव्याचे थेट प्रसारण माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर पाहता येईल.

 

यू ट्यूब- https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR

 

फेसबुक https://www.facebook.com/MahaDGIPR

 

ट्विटर – https://twitter.com/MahaDGIPR