इयत्ता 10 च्या विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन व समुपदेशन शिबिर

इयत्ता 10 च्या विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन व समुपदेशन शिबिर

               भंडारा,दि.14 : आजच्या जगतीकीरणात विज्ञान तंत्रज्ञान माहिती तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थ्यांना व पालकांना योग्य शैक्षणिक व व्यावसायिक मार्गदर्शन मिळणे अगत्याचे झाले आहे. वाढत्या औद्योगीकरणामुळे आणि विज्ञानाच्या प्रगतीमुळे व्यवसायाची अनेक नवीन क्षेत्र आजच्या काळात उपलब्ध झालेली आहेत.

          या क्षेत्रामध्ये सुयोग्य मनुष्यबळाची नेहमीच आवश्यकता भासत असते. या सर्वांची जाणीव विद्यार्थ्यांना व पालकांना करून देणे महत्वाचे आहे. स्वतःच्या आवडीनुसार आणि क्षमतेनुसार विद्यार्थ्यांना योग्य असा शिक्षणक्रम घेता आला  तर त्यांच्या उपजत गुणांना खूप वाव मिळतो. सध्या 10 वी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना उपलब्ध असणारे विविध शिक्षणक्रम व व्यवसाय याची माहिती मिळणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळावे व कुटुंबाचा चांगला सदस्य व भारतीय समाजरचनेचा एक जबाबदार तसेच विकासात्मक कार्यात महत्वाची भूमिका सिद्ध व सुसंस्कृत नागरिक बनवा यासाठी आजच्या शिक्षक, मुख्याध्यापक आणि पालक यांनी अधिक जागरूक व डोळस असणे जरुरीचे आहे.

        विद्यार्थ्यांना राज्यातील व राज्याबाहेरील उपलब्ध असणारे अभ्यासक्रम व करिअरची क्षेत्रे माहिती करून देण्यासाठी छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) पुणे व सारथी विभागीय कार्यालय नागपूर यांचे मार्गदर्शक सूचनेनुसार डायट भंडारा व शिक्षण विभाग माध्यमिक यांनी संयुक्तपणे जिल्हास्तरावर  इयत्ता १० वी च्या ३०० विद्यार्थ्यांसाठी एक दिवसीय करियर मार्गदर्शन व समुपदेशन शिबीर Career Talk कार्यक्रम एस. जी. बी. डिफेन्स सर्विसेस ज्युनिअर कॉलेज शहापूर भंडारा येथे  १४ फेब्रुवारी, २०२४ रोजी सकाळी १०.०० ते सायं ५.०० या कालावधीत आयोजित करण्यात आला.

           राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी पुणे येथील प्रवेश, विज्ञान,  कला, वाणिज्य मधील करिअर संधी, ताण तणावाचे व्यवस्थापन, अभ्यास कौशल्य, स्वतःला ओळखा; करिअर निवडा, परीक्षेला सामोरे जाताना इत्यादी महत्त्वपूर्ण घटकाची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. एमपीएससी व युपीएससी स्पर्धा परीक्षामधील करिअर संधी बाबत  समिर कुर्तकोटी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांनी मार्गदर्शन केले.

            परीक्षेचे दडपण न बाळगताआत्मविश्वासाने सामोरे जावे. अपयशाने खचून जाऊन नका; त्यातून शिका. अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. स्पर्धा परीक्षा मध्ये करिअर करण्याचे स्वप्न उराशी बाळगावे आणि ते स्वप्न प्रत्यक्षात उतरण्यासाठी कसोशीने प्रयत्न करावा. यशस्वी लोकांच्या सवयी आत्मसात करावी. सुप्त मनाची क्षक्ती ओळखा असे समिर कुर्तकोटी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना आवाहन केले.

        तसेच संजय पटले ब्रेन ट्रेनर नागपूर यांनी अभ्यास कौशल्य बाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. डॉ. रेवाराम खोब्रागडे करिअर कन्सल्टंट भंडारा यांनी इयत्ता १० वी नंतर विविध करिअर संधी बद्दल माहिती दिली. स्वप्नील गजभिये समुपदेशक यांनी वैद्यकीय/अभियांत्रिकी प्रवेशपूर्व चाचणी परीक्षाबद्दल मार्गदर्शन केले.नरेंद्र चौधरी समुपदेशक यांनी विज्ञान, कला व वाणिज्य क्षेत्रातील करिअर संधिबद्दल माहिती दिली. स्वतःला ओळखा व करिअर निवडा बाबत श्रीमती मेघा मेश्राम सारथी संस्था विभागीय कार्यालय नागपूर यांनी मार्गदर्शन केले. NDA बाबत विस्तृत माहिती नरेंद्र पालांदुरकर यांनी दिली. रवींद्र सलामे शिक्षणाधिकारी (माध्य), प्राचार्य श्रीमती वंदना लुटे, श्रीमती हर्षाली बाविस्कर, ३५ शाळांचे शिक्षक आणि ३२९ विद्यार्थी शिबिरास उपस्थित होते.