भंडारा : राजर्षी छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कारासाठी अर्ज आमंत्रित

राजर्षी छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कारासाठी अर्ज आमंत्रित

भंडारा, दि. 23 :  जिल्ह्यातील कार्यरत शाळा, कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक, प्राचार्य यांनी त्यांच्या शाळेतून/ महाविद्यालयातून सन 2020-21 या सत्रातील फेब्रुवारी व मार्च 2021 मध्ये 10 वी, 12 वी परीक्षेत प्रथम आलेल्या अनुसूचित जाती, व्हीजेएनटी व एसबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे राजर्षी छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कारासाठी प्रस्ताव त्वरीत सादर करावे, असे आवाहन समाज कल्याण विभागाने केले आहे.

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाव्दारे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्या इयत्ता 10 वी व 12 वी च्या परीक्षेत सर्वसाधारण विद्यार्थ्यांमधून जिल्हा, तालुका, शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातून प्रथम येणाऱ्या अनुसूचित जाती, विमुक्त जाती व भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कार देण्यात येतो. जिल्ह्यातून प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांना 25 हजार, तालुक्यातून प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांना 10 हजार, कनिष्ठ महाविद्यालय व शाळेतून प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांना 5 हजार रुपये पुरस्काराची रक्कम देण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, भंडारा येथे 07184-295257 या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे सहाय्यक आयुक्त सुकेशिनी तेलगोटे यांनी कळविले आहे.