दर्जेदार गुणवत्तेबाबत केंद्रीय शिक्षण सहसचिवांकडून मनपाच्या शाळेचे कौतुक

दर्जेदार गुणवत्तेबाबत केंद्रीय शिक्षण सहसचिवांकडून मनपाच्या शाळेचे कौतुक

Ø बाबुपेठ येथील पी.एम.श्री. सावित्रीबाई फुले उच्च प्राथ व माध्य. शाळेला भेट

Ø विद्यार्थ्यांशी साधला संवाद

चंद्रपूर, दि. 22 : एकीकडे मराठी शाळेत विद्यार्थ्यांचा प्रवेशाचा कल कमी होत असतांना, चंद्रपूर शहरात बाबुपेठ येथील महानगरपालिकेची पी.एम.श्री. सावित्रीबाई फुले उच्च प्राथमिक व माध्यमिक शाळा याला अपवाद ठरली आहे. येथे असलेली हजाराच्यावर विद्यार्थी संख्या, शाळेची गुणवत्ता, दर्जेदार शिक्षण आणि विशेष म्हणजे इंग्रजी कॉन्व्हेंट सोडून येथे शिकत असलेले विद्यार्थी पाहून केंद्रीय शिक्षण विभागाचे सहसचिव आनंद पाटील भारावून गेले. दर्जेदार गुणवत्तेबाबत त्यांनी शाळा व्यवस्थापन, चंद्रपूर महानगर पालिका तसेच जिल्हा प्रशासनाचे विशेष कौतुक करून विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

सहसचिव श्री. पाटील यांनी महानगर पालिकेच्या बाबुपेठ येथील पी.एम.श्री. सावित्रीबाई फुले उच्च प्राथ. व माध्य. शाळेला आज (दि.22) रोजी भेट दिली. यावेळी जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. सहायक जिल्हाधिकारी मुरुगानंथम एम., मनपा आयुक्त विपीन पालीवाल, उपायुक्त चंदन पाटील, शिक्षणाधिकारी राजकुमार हिवारे, उपशिक्षणाधिकारी निकिता ठाकरे आदी उपस्थित होते.

यावेळी बोलतांना सहसचिव श्री. पाटील म्हणाले, या शाळेला भेट देण्याची आज संधी मिळाली आणि अतिशय आनंद झाला. याच शाळेत सन 2014 मध्ये केवळ 100 विद्यार्थीसंख्या होती. तर आज मात्र जवळपास 1100 विद्यार्थी येथे शिक्षण घेत आहे. कॉन्व्हेंटसोडून या शाळेत शिक्षण घेण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांची संख्या सुध्दा काही वर्गात लक्षणीय आहे, ही चंद्रपूर आणि महाराष्ट्राच्यादृष्टीने अतिशय गौरवाची बाब आहे. शासकीय मराठी शाळेत शिक्षणाची गुणवत्ता वाढविल्यामुळे आणि येथील मुख्याध्यापक, शिक्षक आणि संपूर्ण टीम तसेच महानगरपालिका प्रशासन आणि जिल्हा प्रशासनाच्या उत्कृष्ट नियोजनामुळे या शाळेने हा मैलाचा दगड पार केला आहे. महाराष्ट्रातील सर्व शासकीय शाळा, जिल्हा परिषदेच्या शाळा व इतर शाळांनीसुध्दा  चंद्रपूरातील पी.एम.श्री. सावित्रीबाई फुले उच्च प्राथमिक व माध्यमिक शाळेचा आदर्श घ्यावा. येथील पी.एम. पोषणचा दर्जा अतिशय चांगला असून एकंदरीतच शाळेचे कौतुक करावे तेवढे कमी आहे, असे त्यांनी सांगितले.

यावेळी त्यांनी जिल्हाधिकारी विनय गौडा, मनपा आयुक्त विपीन पालीवाल, शाळेचे मुख्याध्यापक तसेच मनपाचे प्रशासन अधिकारी नागेश नीत, येथील सर्व शिक्षक आणि इतर कर्मचा-यांचे विशेष कौतुक केले. तसेच शालेय पोषण आहार कक्ष, स्वयंपाक गृह, वर्गखोल्यांची पाहणी केली.

विद्यार्थ्यांशी संवाद : इयत्ता सहावीच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधतांना सहसचिव आनंद पाटील यांनी विद्यार्थ्यांना, भारताचे राष्ट्रपती, पंतप्रधान, उपराष्ट्रपती कोण, चंद्रपूरच्या जिल्हाधिका-यांना कधी भेटले आहात का, भविष्यात काय व्हायचे आहे, शाळेत यायला आवडते का, जेवण कसे मिळते, रोज किती वाजता जेवता आदी प्रश्न विद्यार्थ्यांना विचारले, यावर विद्यार्थ्यांनी उत्साहपूर्वक आणि मनमोकळेपणाने उत्तरे दिली.