भंडारा : महारेशीम अभियानाला जिल्ह्यात सुरुवात रेशीमरथाव्दारे करणार प्रचार प्रसिध्दी

महारेशीम अभियानाला जिल्ह्यात सुरुवात

रेशीमरथाव्दारे करणार प्रचार प्रसिध्दी

भंडारा, दि. 18 : शेतकऱ्यांना रेशीम शेतीचे महत्त्व व त्यातून मिळणाऱ्या हमखास उत्पन्नाची माहिती व्हावी, याकरीता प्रचार व प्रसिद्धीच्या दृष्टीने 25 ऑक्टोबर ते 25 नोव्हेंबर 2021 या कालखंडात जिल्ह्यात महारेशिम अभियान राबविण्यात येत आहे.

 जिल्ह्यात सन 2022 मध्ये तुती रेशीम  उद्योगाकरीता नवीन लाभार्थ्यांची नाव नोंदणी करण्यासाठी गावात सभा घेण्यात येत आहेत. या अभियानात रेशीम शेतकऱ्यांमध्ये रेशीम शेती विषयी प्रचार -प्रसिद्धी करण्यात येणार आहे .

महारेशीम 2022 अंतर्गत जिल्ह्यातील किमान दहा-पंधरा गावात सभा घेऊन शेतकऱ्यांना सर्व रेशीम उद्योगाची माहिती देण्यात येईल, तसेच त्यासाठी नोंदणी करण्यात येईल. आत्तापर्यंत भंडारा तालुक्यातील कोथूर्णा व लाखांदूर तालुक्यातील मासळ, डोकेसरांडी, आथली, खैरना व असोला येथे सभा घेण्यात आल्या त्याला शेतकऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिला आहे.

भंडारा जिल्ह्यातील पवनी, मोहाडी, लाखांदूर व भंडारा तालुक्यात तुती लागवड करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांनी ग्रामसभेचा ठराव घेऊन रेशीम कार्यालयात संपर्क करावा. तसेच ज्या गावाच्या परिसरात ऐन, अर्जुन वृक्षाचे जंगल आहे त्या गावातील गावकऱ्यांनी टसर रेशीम उद्योग करण्यासाठी जिल्हा रेशीम कार्यालय, जिल्हा परिषद परिसर सभागृहाच्या मागे, भंडारा येथे संपर्क साधण्याचे ,आवाहन रेशीम विकास कार्यालयाने केले आहे.