जिल्ह्यात लाळ – खुरकत रोग नियंत्रणासाठी 3 लाख 20 हजार लस मात्रा उपलब्ध Ø पशुंना लसीकरण करून घेण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

जिल्ह्यात लाळ – खुरकत रोग नियंत्रणासाठी
3 लाख 20 हजार लस मात्रा उपलब्ध
Ø पशुंना लसीकरण करून घेण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

भंडारा, दि. 11 : लाळ – खुरकत रोग हा विषाणूजन्य रोग असून एका जनावरापासून दुसऱ्या जनावरांना सहज या रोगाची लागण होते. या रोगाला तोंडखुरी, पायखुरी असेही म्हणतात. या आजारात जनावरांच्या तोंडात जिभेवर व खुरात जखमा होतात. तोंडाव्दारे लाळ गाळणे, लंगडणे, ताप येणे, धाप लागणे, चारा-पाणी कमी खाणे/ बंद होणे आदी लक्षणामुळे जनावर अशक्त होतात. वेळीच योग्य काळजी घेतली नाही तर जनावरे दगावतात. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व गोपालकांनी आपल्या नजिकच्या पशुवैद्यकीय संस्थेकडून लाळ-खुरकत रोगप्रतिबंधक लसीकरण करण्यापूर्वी आपल्या जनावरांना टॅगींग करुन लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी दिले आहे. यासाठी जिल्ह्यात 3 लाख 19 हजार 900 लस मात्रा उपलब्ध झाल्या आहेत.

राष्ट्रीय पशुरोग नियंत्रण कार्यक्रम या शंभर टक्के केंद्र पुरस्कृत योजनेंतर्गत लाळ – खुरकत रोगप्रतिबंधक लसीकरणाची दुसरी फेरी 8 नोव्हेंबर ते 25 डिसेंबर 2021 या कालावधीत राबवायची आहे. याकरीता जिल्हाधिकारी संदीप कदम यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पी. एम. चौधरी, जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. वाय. एस. वंजारी, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. नरेश कापगते, जिल्हा सहकार उपनिबंधक कार्यालयाचे मनिष देशकर, सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन डॉ. एन. एम. कोरडे यांची उपस्थिती होती.

2020 च्या पशुगणनेनुसार भंडारा जिल्ह्यात 2 लाख 13 हजार 36 गायवर्ग व 1 लाख 6 हजार 861 म्हैसवर्ग अशी एकूण 3 लाख 19 हजार 897 गोवंशीय जनावरे आहेत. जिल्ह्यात लाळ – खुरकत रोगनियंत्रणासाठी 3 लाख 19 हजार 900 लस मात्रा प्राप्त झाल्या आहेत. जिल्ह्यातील एकूण 85 पशुवैद्यकीय संस्थांना लस वितरीत करण्यात आली असून लसीकरण कार्याला सुरुवात झाली आहे, असे जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. वाय. एस. वंजारी यांनी कळविले आहे.