बिबट मृतावस्थेत आढळला, वन विभागातर्फे तपास सुरू

बिबट मृतावस्थेत आढळला, वन विभागातर्फे तपास सुरू

भंडारा,दि.17:- आज 17 ऑक्टोबर 2021 रोजी सकाळी साडे आठच्या सुमारास भंडारा वनपरिक्षेत्रातील मौजा कोका येथील खाजगी गट क्रमांक 499 भुताई बोडी याठिकाणी बिबट्या वन्यप्राणी मृतावस्थेत असल्याची माहिती मिळताच उपवनसंरक्षक एस. बी. भलावी, सहाय्यक वनसंरक्षक वाय. बी. नागुलवार व वनपरिक्षेत्र अधिकारी भंडारा व्ही. बी. राजूरकर घटनास्थळी पोहोचले. घटनास्थळी त्यांना बिबट नर अंदाजे पाच ते सहा वर्ष वयोगटातील वन्य प्राणी मृतावस्थेत आढळला. त्यानंतर तात्काळ राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरण यांचे मार्गदर्शक सूचनांचे प्रमाणे मोका स्थळ पंचनामा करण्यात आला व त्यानंतर सदर वन्य प्राण्याचे शवविच्छेदन लाखणीचे पशुधन विकास अधिकारी गुणवंत भडके व मानेगावचे पशुधन विकास अधिकारी विठ्ठल हटवार यांनी केला. सदर प्रसंगी प्रधान मुख्य वनसंरक्षक वन्यजीव यांचे प्रतिनिधी म्हणून मानद वन्यजीव रक्षक भंडारा शाहिद खान व राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरणाचे प्रतिनिधी म्हणून सहाय्यक वनसंरक्षक साकेत शेंडे हे उपस्थित होते. पुढील तपास उपवनसंरक्षक एस. बी. भलावी यांचे मार्गदर्शनाखाली सुरू आहे